विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी: विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने कार्यरत, शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी श्री शेखर वांढरे यांच्या मार्गदर्शनात वारली चित्रकारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्यासह सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे तथा विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ अभिजित अणे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये जीवनात एक तरी छंद असावा यासाठी आपण प्रयत्न करायला हवा असे म्हणत भविष्यात विद्यापीठामध्ये या विषयावर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे विचार प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे त्यांनी व्यक्त केले.
समन्वयक डॉ अभिजित अणे यांनी कार्यशाळे मागील भूमिका आणि विद्यार्थ्यांना त्याचा मिळणारा लाभ या विषयावर उद्बोधन केले.
मा. श्री कुमार चिंता पोलीस अधिक्षक यवतमाळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऑपरेशन प्रस्थान च्या अंतर्गत मी अनेक जागी अशा कार्यशाळा घेत असलो तरी याचा आरंभ लोकमान्य टिळक महाविद्यालयात झाल्याचा मला आनंद आणि अभिमान आहे असे मत व्यक्त करीत पोलीस अधिकारी श्री शेखर वांढरे यांनी वारली पेंटिंग चा इतिहास आणि स्वरूप यावर विस्तृत प्रकाश टाकला. मोबाईल आणि व्यसनापासून युवा पिढीला दूर ठेवण्यासाठी हे माझे योगदान आहे हे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले.अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी वेळ काढला तरच मिळतो असे म्हणत शेखर वांढरे ही वणीला आणि पोलीस विभागाला मिळालेली देण आहे हे विशेषत्वाने अधोरेखित केले.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन मंजुळा चिकनकर आणि शिफा सिद्धीकी यांनी तथा समारोप सत्राचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे डॉ. प्रफुल्ल कोसे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शैलेश जिट्टावार यांनी केले.
पूजा देठे आणि दीपक शाहू या दोन विद्यार्थ्यांना विशेष कौशल्याबद्दल शेखर वांढरे यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाच्या ५० विद्यार्थ्यांनी आणि संगणक विभागाचे विभाग प्रमुख डॉ.होमराज पटेलपैक यांनी विशेषत्वाने सहभाग घेतला.



