ठळक बातम्या

    संविधानात प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब – चंद्रशेखर अभ्यंकर

     

    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : शासन व्यवस्थेने कशा प्रकारे वागावे याचे दिशा दर्शन भागवत, रामायण, महाभारतातुन मिळते. संविधानात रामराज्याची संकल्पना घेण्यात आली आहे. आपले संविधान हजारो वर्षाची आपली संस्कृती , आदर्श शासन व्यवस्था पुढे नेण्याचे काम करते.   यात पूर्णतः प्राचीन भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसून येत असे प्रतिपादन विरार ( मुंबई) चे प्रसिद्धः वक्ते चंद्रशेखर अभ्यंकर यांनी केले. ते येथील नगर वाचनालयात आयोजित हेमंत व्याख्यानमालेचे 38 व्या वर्षातील दुसरे पुष्प पुष्प गुंफताना बोलत होते.  हे दुसरे पुष्प स्व.  रमेश उंबरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नितीन रमेश उंबरकर यांनी प्रायोजित केले होते. 

           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष विद्याताई आत्राम या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा उपस्थित होते. व्यासपीठावर नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार हे उपस्थित होते. त्यांनी प्रास्ताविक करून या व्याख्यानमालेचे पार्श्वभूमी विशद केली. 

    स्नेहलता चुंबळे यांच्या स्वागतगीतानंतर नगर वाचनालयातर्फे नवनिर्वाचित अध्यक्ष विद्याताई आत्राम यांचा शाल श्रीफळ देऊन संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सत्कार केला. त्यानंतर आपला विषय मांडताना अभ्यंकर म्हणाले की, कोणताही देश कसा चालावा याचे लिखित स्वरूपात जे नियम बनविलेले असतात त्याला संविधान असे म्हणतात. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपला देश चालविण्यासाठी ज्या नियमांची आवश्यकता होती. त्यासाठी 299 प्रतिनिधींची संविधान सभा निर्माण करण्यात आली. त्यात 15 महिला सदस्य होत्या. आपल्या गौरवाची बाब म्हणजे या वणी शहराचे भूषण असलेले लोकनायक बापूजी अणे हे या संविधान सभेचे सदस्य होते. 

           संविधान सभेतील चर्चा, चिंतन, सदस्यांनी मांडलेले विचार याचे संकलन करून योग्य निष्कर्षासह शब्दबद्धः करण्याचे कठीण काम मसुदा समितीने केले. यात या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांना संविधानाचे शिल्पकार म्हटल्या जाते. 

         प्रमुख अतिथी ओमप्रकाश चचडा यांनी समेयोचित प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषण करताना विद्याताई आत्राम यांनी देशाच्या सर्वात मोठ्या लिखित संविधानाचे वैशिष्ट सांगून प्रत्येकाने नागरिकाने संविधानाचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन संचालक अर्जुन उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे उपाध्यक्ष विशाल झाडे, संचालक हरिहर भागवत, अनिल जयस्वाल, प्राची पाथ्रडकर, ग्रंथपाल देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.

    Photo