विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : संत शिरोमणी गाडगेबाबा यांनी मानवसेवा, स्वच्छता, समता व दीनदुबळ्यांच्या उत्थानाचा संदेश समाजाला दिला. “भुकेल्याला अन्न, उघड्याला वस्त्र आणि गरजूला आधार” हा त्यांचा मूलमंत्र आजही समाजमनात जिवंत आहे. याच विचारातून ऋणमोचन येथे पोष महिन्यात भरणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेली भोजन पंगत आजही अखंडपणे सुरू आहे.
या यात्रेत दानदात्यांच्या सहकार्याने हजारो दीनदुबळे, गरजू पुरुष व महिला दरवर्षी भोजनाचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भाविक या यात्रेसाठी ऋणमोचन येथे येत असतात. संत गाडगेबाबांच्या विचाराने प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ३०० ते ४०० यात्रेकरू दरवर्षी या यात्रेत सहभागी होत असून, हे सर्व यात्रेकरू मा. सुभाष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी जपत यात्रेस प्रस्थान करतात.
दिंनाक १७/१/२०२६ ला ऋणमोचन यात्रेला जाणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी वणी येथे स्वर्गवासी तातोबा वाघमारे यांच्या वतीने चहा-बिस्किटांची सेवा केली जात होती. ही परंपरा आजही अखंड सुरू असून, सध्या ही सेवा श्री. संजय तातोबा वाघमारे व श्री. विजय तातोबा वाघमारे यांच्या मार्फत निस्वार्थ भावनेने चालू आहे.या निस्वार्थ सेवे साठी मा. रमेश क्षिरसागर, संजय चिंचोलकर, उमाकांत भोजेकर, सारंग बिहारी, विनोद चिंचोलकर, मंगेश रासेकर, प्रशांत महाकुलकर, भरत बोबडे, महेश बोबडे, रोशन चिंचोलकर, राहुल चौधरी, भास्कर पत्रकार उपस्थित होते.
ही सेवा म्हणजे केवळ पाहुणचार नसून, संत गाडगेबाबांच्या विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे. जात-पात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाशी जोडणारी ही मानवसेवा समाजाला एकतेचा, समतेचा आणि करुणेचा संदेश देत आहे. संत गाडगेबाबांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत आजही अनेक हात सेवा कार्यासाठी पुढे येत आहेत, हीच त्यांच्या विचारांची खरी जिवंत साक्ष ठरत आहे.


