ठळक बातम्या

    पिंपळगाव–बोरगाव जुनाड व परिसरातील समस्यांवर ग्रामस्थांचा आक्रोश; वेकोली व कोल इंडिया चेअरमनकडे निवेदन


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

     वणी : पिंपळगाव–बोरगाव जुनाड व परिसरातील गावांमध्ये वेकोलीच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी, प्रदूषण आणि सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, त्याकडे वेकोली प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळगाव येथील सरपंच माननीय दीपकभाऊ मते यांच्या नेतृत्वाखाली आज कोल इंडियाचे चेअरमन व वेकोलीचे सीएमडी यांच्या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी थेट निवेदन देण्याचा प्रयत्न केला.

    वेकोली प्रकल्पांमुळे स्थानिक मजूर व युवकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. त्याचबरोबर गावाच्या सभोवताल मातीचे ढिगारे टाकल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. पावसाळ्यात वर्धा नदीला पूर येत असल्याने गावाच्या आजूबाजूला पाणी साचते व नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण होते. याशिवाय, झुडपी जंगल वाढल्याने वाघ, अस्वल, रानडुक्कर यांसारख्या जंगली प्राण्यांचा वावर वाढून हल्ल्यांच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    या सर्व गंभीर समस्यांवर उपाययोजना करण्याऐवजी वेकोली प्रशासन पुनर्वसनास तयार नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आज कोल इंडिया चेअरमन व वेकोली सीएमडी यांचा या भागात दौरा असल्याने बोरगाव फाट्यावर बहुसंख्य ग्रामस्थांनी ताफा थांबवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेकोलीतील काही अधिकाऱ्यांनी आपले अपयश वरिष्ठांच्या समोर येऊ नये, यासाठी चेअरमन यांची दिशाभूल करून ताफा पर्यायी मार्गाने वळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

    या अडथळ्यांनंतरही सरपंच माननीय दीपकभाऊ मते व त्यांच्या सहकाऱ्यांनी हार न मानता नायगाव–बेलोरा चेक पोस्टजवळ सीएमडी यांच्या ताफ्याला थांबवून प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी पिंपळगाव–बोरगाव जुनाड तसेच परिसरातील इतर गावांच्या बेरोजगारी, प्रदूषण, पूरस्थिती, वन्यप्राण्यांचा धोका आणि पुनर्वसनासंबंधीच्या समस्या सविस्तरपणे मांडून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली.

    गोरगरिब, बेरोजगार युवक आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या सरपंच माननीय दीपकभाऊ मते यांच्या ठाम भूमिकेचे ग्रामस्थांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले असून, प्रशासनाने आता तरी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

    Photo