ठळक बातम्या

    डॉ. मानस कुमार गुप्ता यांचा सेवानिवृत्ती सन्मान.


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

     वणी :  शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मानस कुमार गुप्ता यांना षष्ठाब्दी निमित्त सेवानिवृत्ती स्वरूपात सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, प्राचार्य प्रसाद खानझोडे, औषधी निर्माण शास्त्र विभागाचे प्राचार्य डॉ. सुधाकर रेड्डी तथा सत्कारमूर्ती डॉ.मानस कुमार गुप्ता हे मान्यवर उपस्थित होते. 

              प्रास्ताविकामध्ये इंग्रजी विभागाचे डॉ अभिजित अणे यांनी गुप्ता यांच्या २८ वर्षाच्या प्रदीर्घ सहवासावर प्रकाश टाकत अस्खलित इंग्रजी ऐकण्याची आणि बोलण्याची सवय यांच्यामुळेच संवर्धित झाल्याचे अधोरेखित केले. 

            शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी राजू आगलावे यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या भूमीतून वणी मध्ये येत गुप्ता यांनी दिलेल्या विविध योगदानांचे वर्णन केले. 

            कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा. आनंद हूड यांनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणा ,ठाम भूमिका, चूक वाटल्यास क्षमा मागण्याची विशाल वृत्ती इत्यादींवर प्रकाश टाकला.

            वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा. प्रफुल्ल कोसे यांनी गुप्ता यांच्या बौद्धिक विनम्रता, अभ्यास वृत्ती, संगीत प्रेमावर विशेष विवेचन केले.

           डॉ गजानन अघळते यांनी ग्रंथ प्रेम, प्रा. शैलेश जिट्टावार यांनी कामातील प्रामाणिकपणा तर आनंद नार्लावार यांनी प्रवाहाच्या विरुद्ध वेगळी दिशा घेण्याच्या प्रवृत्तीला अधोरेखित केले. 

           प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी महाविद्यालयाच्या प्रदीर्घ कार्यकाळात प्राधान्याने कोणत्याही विषयाच्या इंग्रजी सादरीकरणात आणि प्रशासकीय कार्यांमध्ये त्यांच्या सातत्याने मिळालेल्या सहकार्याचा गौरव करीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये घडलेल्या विविध परिवर्तनांना विशद केले. 

             सहसचिव अशोक सोनटक्के यांनी महाविद्यालयातील इंग्रजी  विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेवर प्रकाश टाकला

    सत्कारमूर्ती मानस कुमार गुप्ता यांनी सर्व व्यक्तींनी केलेल्या कौतुकाने भावनिक होत मी खरंच इतका चांगला आहे का ? असा प्रश्न मलाच पडतो असे म्हणत महाविद्यालयाच्या योगदानाविषयी आणि प्रत्येकाने मला काहीतरी शिकविले अशा सहकाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

             अध्यक्षीय मनोगतामध्ये विजय मुकेवार यांनी गुप्ता यांच्या नियमितपणाचा गौरव करीत वर्गात विद्यार्थी कमी होत असल्याची त्यांची खंत बोलून दाखवत उपस्थित त्यांना त्यावर विचार करण्याचे आवाहन केले. 

             याप्रसंगी मंडळाच्या वतीने लोकमान्यांची प्रतिमा देऊन तथा इंग्रजी विभागाच्याद्वारे सलोनी डाहुले या विज्ञान द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी रेखाटलेले छायाचित्र देऊन गुप्ता यांचा सन्मान करण्यात आला. 

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद नगराळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.शैलेश जिट्टावार यांनी केले.



    Photo