विदर्भवार्ता |प्रतिनिधी
वणी : वणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू वाटप करण्याचा निर्णय अखेर प्रत्यक्षात आला असून, सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
मा. श्री. विजय पिदुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याने वणी तालुक्यातील तब्बल १०० ग्रामपंचायतींमधील सुमारे ६ हजार घरकुल लाभार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
या वाळू वाटप प्रक्रियेत ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल, सरपंच तसेच संबंधित लाभार्थी यांची उपस्थिती अनिवार्य राहणार असून, प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे.
शासनाच्या निर्देशानुसार लिलावा, भुर्की व बेलोरा या वाळू घाटांमधून १० टक्के व उर्वरित वाळू ३९ नदी व नाल्यांमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या आदेशान्वये वणी तालुक्यातील प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला मंजूर परिमाणानुसार कमाल ५ ब्रास वाळू दिली जाणार असून, हे वाटप पुढील आदेश येईपर्यंत ग्रामपंचायतनिहाय सुरू राहणार आहे.
वाटप प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोडल व सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीतच संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.
ग्रामपंचायतींनी योग्य नियोजन व समन्वय राखल्यास रेती माफियांना आळा बसेल, घरकुल बांधकामाचा मार्ग मोकळा होईल आणि गरजू लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे आवाहन मा. श्री. विजय पिदुरकर यांनी केले आहे.



