विदर्भवार्ता|प्रतिनिधी
घुग्घुस : धोबी परीट जनकल्याण संस्था, घुग्घुस यांच्या वतीने कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन सोमवार व मंगळवार, दि. २३ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा महोत्सव संत गाडगे महाराज स्मारक भवन, वार्ड क्रमांक ६, जनता कॉलेज रोड, घुग्घुस येथे पार पडणार आहे.
संत गाडगे महाराजांचा “भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, गरीबांना शिक्षण, बेघरांना आसरा, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु-पक्षी व मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे विवाह व दुःखी-निराशांना धीर देणे हाच खरा धर्म” हा दशसूत्री मानवतावादी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण होणार असून, हा कार्यक्रम मा. सौ. दिप्तीताई सुजित सोनटक्के (नगराध्यक्षा, नगर परिषद घुग्घुस), मा. श्री. राजुभाऊ रेड्डी (उपनगराध्यक्ष) तसेच श्री चिंचोलकर महाराज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सायंकाळी ६ वाजता संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये श्री गुरुदेव नगाजी महाराज महिला भजन मंडळ व शारदा महिला भजन मंडळ, घुग्घुस सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता प्रमुख पाहुण्यांचा स्वागत समारंभ होईल.
सायंकाळी ६ वाजता जाहीर कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार व सप्तखंजिरी वादक कु. क्रांतीताई काळे (रा. साखरी, ता. अंजनगाव (सुर्जी), जि. अमरावती) यांचा जाहीर प्रबोधनात्मक कीर्तन कार्यक्रम होणार आहे.
या महोत्सवात जय भवानी महिला भजन मंडळ, शारदा महिला भजन मंडळ, जय गुरुदेव संत नगाजी महाराज महिला भजन मंडळ आदी भजन मंडळांची उपस्थिती लाभणार आहे.
तरी घुग्घुस व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत गाडगे महाराजांच्या विचारांचा जागर करण्याचे आवाहन आयोजक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️




