विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजा मानकी येथे अवैध दारू विक्री खुलेआम सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दारूच्या व्यसनामुळे गावातील युवक व पुरुष मंडळी व्यसनाधीन होत असून, त्यातून घराघरांत वाद, तंटे व मारहाणीचे प्रकार वाढत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
सभेमध्ये गावातील सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही महिलांनी केली. गावातील सामाजिक वातावरण बिघडू नये आणि कुटुंबे सुरक्षित राहावीत यासाठी महिलांनी एकजूट दाखवत ठाम भूमिका घेतली.
यावेळी सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय काकडे, पोलिस पाटील सौ. मिनाक्षी सुजीत मिलमिले, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष परशुराम पोटे तसेच सुमारे १२० महिला ग्रामसभेला उपस्थित होत्या. या ग्राम सभेचे कामकाज ग्राम विकास अधिकारी आर.एच. सोळंके यांनी सांभाळले.
सदर ग्रामसभेच्या ठरावाची प्रत संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात येणार असून पोलिस प्रशासन काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
मात्र महिलांच्या या निर्धारामुळे मानकी गावात लवकरच अवैध दारूविक्रीवर आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

