विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : संस्कार भारती समिती, सागरझेप बहुद्देशीय संस्था व जैताई मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भारत माता पूजन तसेच स्व. माधव सरपटवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता जैताई मंदिर परिसरात संपन्न होणार असून, चंद्रपूर येथील प्रसिद्ध वक्ते प्राचार्य दिलीप चौधरी हे “राष्ट्रहितासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
महात्मा फुले यांनी समाजसुधारणा, शिक्षणाचा प्रसार आणि राष्ट्रनिर्मितीसाठी केलेल्या कार्याचे महत्त्व या व्याख्यानातून उलगडले जाणार आहे. कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी वणी शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व श्रोत्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे
.

