विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : मौजा मुंगोली येथील वे.को.ली. मार्फत सुरू असलेल्या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या रस्ते, नाल्या व इतर सार्वजनिक बांधकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप बाबाराव कवडूजी ठाकरे, गणेश दादाजी पुरडकर, सौ, कविता ग पुरडकर, कवडू लक्ष्मण बाचुलकर, सौ, प्रतिभा अशोक क्षिरसागर, सौ, कोकिळा ग बावणे, मंगेश ग बावणे ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत यवतमाळ जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन नियोजन समिती अध्यक्ष आणि वणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन सादर करण्यात आले आहे.
मुंगोली पुनर्वसन स्थळी नाली, रस्ता, शाळा, ग्रामपंचायत भवन, दवाखाना आदी मूलभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र संबंधित कंत्राटदार अंदाजपत्रक व तांत्रिक निकष डावलून स्वतःच्या मनाने निकृष्ट दर्जाचे बांधकाम करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेषतः नाल्यांचे बांधकाम अतिशय हलक्या दर्जाचे असून रस्ते व इतर कामेही गुणवत्तेच्या निकषांवर उतरलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या संदर्भात दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव क्रमांक 6/1 मंजूर करून निकृष्ट कामाबाबत आक्षेप नोंदवण्यात आला होता. त्या ठरावाची सत्यप्रत निवेदनासोबत प्रशासनाला सादर करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सदर सर्व कामांची तातडीने चौकशी करून दोषी कंत्राटदारावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पुनर्वसनाचा उद्देशच धोक्यात येईल, अशी भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.
या निवेदनावर मुंगोली येथील अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून प्रतिलिपी वणी एरिया महाप्रबंधक, S/O सिव्हिल अधिकारी व इतर संबंधित विभागांना पाठवण्यात आली आहे.




