ठळक बातम्या

    वणी शहर हादरले! आपसी वादातून तरुणाचा लोखंडी रॉडने निर्घृण खून, गुन्हेगारीने उचलले डोके

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी शहरात पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने खळबळ उडाली आहे. आपसी वादातून एका तरुणाचा लोखंडी रॉडने निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० ते १० वाजताच्या सुमारास शहरातील संजय ऑटो मोबाईल येथे घडली. मल्लेश प्रेमकोंडावार (वय अंदाजे २३ ते २४, रा. दामले फैल, वणी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    शहरातून जाणाऱ्या वणी–चिखलगाव या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर, भरवस्तीत ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. किरकोळ कारणावरून थेट खून करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

    प्राथमिक माहितीनुसार, भुऱ्या (वय अंदाजे ३०, रा. पळसोनी) या युवकाने आपसी वादातून मल्लेशवर लोखंडी रॉडने सपासप वार करत त्याचा निर्घृण खून केला. मल्लेश व भुऱ्या हे दोघेही टपोरी प्रवृत्तीचे असल्याचे बोलले जात असून, दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून जोरदार वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

    वणी पोलीस स्टेशन हद्दीत याआधीही पाठोपाठ खुनाच्या घटना घडल्या असून, गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक संपल्याचे चित्र नागरिकांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली होती. मात्र त्यानंतरही गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसलेला नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

    घटनेची माहिती मिळताच सुरेश दळवे (एसडीपीओ) आणि गोपाल उंबरकर (ठाणेदार) यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पुढील तपास वणी पोलीस स्टेशन करीत आहे.

    शांतताप्रिय म्हणून ओळखले जाणारे वणी शहर पुन्हा एकदा गुन्हेगारी कारवायांमुळे चर्चेत आले असून, आजच्या या खुनाने शहर अक्षरशः हादरले आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.



    Photo