विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वस्तीश: विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष होत आहेत. आपल्या देशातील नागरिकांना हक्कांची जाणीव निर्माण झाली आहे. पण दुर्दैवाने अजून आपल्या कर्तव्याप्रती आपण जागरूक नाही. ही सर्वात मोठी खंत आहे. या देशातील सनातनी, हिंदू असण्यापेक्षा आपण हिंदू कस दिसू याविषयी जागरूक झाला आहे. पण ही हिंदू असण व दिसण हे कृतीत आलं पाहिजे त्यासाठी समाजात मूलभूत परिवर्तन व्हावे यासाठी संघाने पंच परिवर्तनातून समाज घडवण्याचा ध्यास घेतला आहे. असे प्रतिपादन यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांनी केले. ते वणी येथे सकल हिंदू समाज ओम नगर वस्ती तर्फे आयोजित विशाल हिंदू संमेलनात मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत दिव्यानंद खत्री, लक्ष्मी नारायण पतसंस्था अध्यक्ष संगीता खाडे, या संमेलनाचे संयोजक शरद इंगळे उपस्थित होते.
आपला विषय मांडताना खर्चे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर संविधानात हक्क व कर्तव्य स्पष्ट करण्यात आले आहे. आपल्या घरातील परिसरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, कर्तव्य म्हणून मतदान करणे, कर चुकवेगिरी न करणे, वीज चोरी न करणे, राष्ट्रीय मानचिन्हाचा आदर करणे, त्याच प्रमाणे राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे. अशी नागरिक म्हणून आपली नागरी कर्तव्य पार पाडली पाहिजे. समाजाचा शेवटचा घटक कुटुंब आहे. आपल्या कुटुंबाचा संवाद संपला आहे. योग्य संस्कार मिळत नाही त्यामुळे कुटुंब व्यवस्था उद्धस्त होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी कुटुंब प्रबोधनाची आवश्यकता आहे. सामाजिक समरसता निर्माण करावी लागेल. पर्यावरणाची प्रचंड प्रमाणात हानी सुरू आहे. ती आपण स्वतः थांबवली पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर करू नये. रेनवॉटर हार्वेस्टिक करून जल संकटावर मात करावी लागेल. आपण आपलं स्व तंत्र विसरलो आहोत. त्यामुळे आपण पाच्यात्यांच अंधानुकरण करू लागलो. विदेशी वस्तूंचं आकर्षण आहे. त्यामुळे स्वदेशीचा विसर पडत आहे. ठरवून आपल्या संस्कृतीवर आक्रमण होत आहे. यात आपण सुद्धा अज्ञानाने हातभार लावत आहोत. पण आपलं अस्तित्व विसरून चालणार नाही. असे प्रतिपादन त्यांनी केले.
उपस्थित सकल हिंदू समाजाला आशीर्वचन देताना युवा धर्म विचारक संत दिव्यानंद खत्री म्हणाले की, हा विशाल हिंदू संमेलन उत्सव नसून राष्ट्र निर्माणासाठी संघाने केलेल्या प्रयत्नाला नमन आहे. १९२५ रोजी स्थापन झालेला संघ आज वटवृक्ष झाला आहे. व्यक्तीच्या वयानुसार श्रेष्ठत्व ठरत नाही. आपली ओळख ही आपले कर्म व चरित्र यावरून होते. संघाची ज्या सिद्धांतावरून वाटचाल सुरू झाली तो सिद्धांत आजही तेच आहे. १०० वर्षानंतरही या सिद्धांताची मशाल अजूनही स्वयसेवकांच मनात जळत आहे. हिंदू ही सांस्कृतिक ओळखी सोबत देशाची भौगोलिक ओळख आहे. असे सांगून हिंदुत्वाची ज्योत प्रत्येकानी मनात तेवत ठेवावी असे आवाहन केले. याप्रसंगी युवा यशस्वी उद्योजक हर्षल महादेव नक्षने याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संमेलनाच्या आधी ओम नगर वस्तीतील महिलांची कलश यात्रा काढण्यात आली.
या संमेलनाचे प्रास्ताविक संमेलनाचे संयोजक शरद इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन रवी चव्हाण यांनी व आभारप्रदर्शन अरुण लाकडे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ओम नगरीतील स्त्री पुरुषांनी परिश्रम घेतले.




