ठळक बातम्या

    वणीतील सी.सी.आय. कापूस खरेदीतील अनागोंदीविरोधात शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; स्लॉट व मुदत वाढीची मागणी

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी येथील सी.सी.आय. कापूस खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असून, यासंदर्भात मा. देवेन्द्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी हे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत देण्यात आले.

    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वणी येथे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सी.सी.आय.) मार्फत कापूस खरेदी २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी स्लॉट बुकिंग केले असले तरी, अनेक नोंदणीकृत शेतकऱ्यांना अद्याप स्लॉट उपलब्ध करून दिले जात नाहीत. तसेच खरेदी केंद्रावर कापूस नेल्यानंतर ‘कापूस खवडी आहे’, ‘गुणवत्ता खराब आहे’, ‘मागचा कापूस आहे’ अशी कारणे देत वाहने परत पाठवली जात असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत ठेवले जाते.

    शासनाच्या हमीभावावर विश्वास ठेवून कापूस विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना या मनमानी कारभारामुळे नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांकडे कवडीमोल दराने कापूस विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असून, प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

    यावर्षी पावसाचे प्रमाण लांबल्याने कापूस उशीरा निघत असून, त्यामुळे कापूस विक्रीची मुदत वाढविणे अत्यावश्यक आहे. म्हणून सी.सी.आय. कापूस खरेदी व विक्री स्लॉट बुकिंगची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    हे निवेदन भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा ओबीसी अध्यक्ष पवन ऐकरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी शेतकरी शाम तराळे, बाळू खामनकर, राहुल आत्राम, संजय चिंचोलकर, नेताजी भोयर, बंडू खंडारकर, कैलास पिपराडे, लक्ष्मण राजूरकर, राजू वांढरे, मंगेश उरकुडे, विनायक ढवस, अनंता बोढे, भवानी मांदाडे, अक्षय लोढे, विनोद पचकटे व विशाल दानव आदी उपस्थित होते.

    शेतकरी हिताचा विचार करून सी.सी.आय. अधिकाऱ्यांच्या मनमानीला आळा घालावा व कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व शेतकरीपूरक करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.



    Photo