विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : जागतिक महिला दिन व विश्वयोग आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त वणी येथे महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून विविध स्त्रीरोग व आरोग्य समस्यांचे निदान करण्यासाठी हे शिबिर मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व विश्वयोग आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, वणी यांच्या वतीने महिलांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पंचकोशीतील नागरिकांसाठी आयुर्वेदतज्ज्ञांकडून शास्त्रोक्त नाडी परीक्षण, रोगनिदान व आरोग्य सल्ला दिला जाणार आहे.
हे शिबिर दि. १७ मार्च २०२६, मंगळवार रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत विश्वयोग आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, विजय फर्निचरच्या वर, एल.टी. कॉलेजजवळ, वरोरा रोड, वणी येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या पाळी अनियमित होणे, पाळी उशिरा किंवा लवकर येणे, पाळीदरम्यान वेदना, जास्त रक्तस्त्राव, पांढरे पाणी, अंगावर खाज, वंध्यत्व, वारंवार गर्भपात, गर्भधारणेतील अडचणी, गर्भाशयाशी संबंधित समस्या, स्तनांमध्ये गाठी, लघवीचे त्रास, पचनाचे विकार, रक्ताची कमतरता आदी विविध आजारांबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच शिबिरात आयुर्वेदिक नाडी परीक्षणाद्वारे रोगनिदान, आहार-विहार व प्राणायाम याबाबत मार्गदर्शन दिले जाणार असून आवश्यकतेनुसार पंचकर्म उपचारांमध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे.
शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून तपासणीसाठी येताना सुरू असलेल्या औषधोपचाराची माहिती, सोनोग्राफी, एक्स-रे किंवा इतर तपासण्यांचे अहवाल सोबत आणावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७०३८३८१५५३ व ९३५९६२१५०१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

