विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : आदिवासी समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी कार्यरत असलेल्या आदिवासी टायगर सेना यवतमाळ जिल्ह्याची कार्यकर्ता बैठक आज रविवारी (दि.१५) घाटंजी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दुपारी १ वाजता आयोजित या बैठकीला संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष रमेशजी धुर्वे, जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ तोडसाम तसेच महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई केराम यांची उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान संघटनेच्या विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी ए टी एस (ATS) चे यवतमाळ जिल्हा महासचिव अमोल कुमरे यांच्या हस्ते वणी तालुका अध्यक्षपदी लहानू सालूरकर यांची निवड जाहीर करण्यात आली, तर तालुका सचिवपदी महेश आत्राम यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मारेगाव तालुका अध्यक्षपदी विवेक तोडासे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे ध्येय-धोरण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. आदिवासी समाजाच्या आत्मसन्मान, अस्मिता, शिक्षण, संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण यासाठी वैचारिक कॅडर बेस संघटनेची गरज लक्षात घेऊन आदिवासी टायगर सेनेची स्थापना झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. संघटनेची वैचारिक व संघटनात्मक शिस्त पाळत समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


