ठळक बातम्या

    वणीतील कुस्ती महादंगल गाजली; विजय शिंदे ठरला ‘माजी आमदार केसरी’

     देशभरातील पैलवानांची उपस्थिती; १६७ कुस्त्यांनी रंगला जत्रा मैदान



    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी येथील जत्रा मैदानावर २८ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार पुरस्कृत भव्य "माजी आमदार केसरी" काटा कुस्ती महादंगल स्पर्धेला हजारो प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. स्व. श्रीमती सुनंदा मधुकरराव उंबरकर स्मृती स्टेडियम, यात्रा मैदान येथे  हा भव्य सोहळा रंगला.

    महिला व पुरुष अशा दोन्ही गटातील कुस्त्यांमुळे या महादंगलला विशेष आकर्षण लाभले. तब्बल १६७ जोड कुस्त्या लावण्यात आल्या असून, महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दिल्ली येथील नामांकित पैलवानांनी सहभाग नोंदवला.

    या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.


    पुरुष गटातील अंतिम लढतीत वाशिमचा पैलवान विजय शिंदे (वारा) याने उत्कृष्ट कामगिरी करत “माजी आमदार केसरी” किताब पटकावला. त्याला स्व. ललित लांजेवार स्मरणार्थ चांदीची मानाची गदा व एक लाख रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. उपविजेता म्हणून पुण्याचा अक्षय शेळके याने स्थान मिळवले.

    पुरुष गटात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अनिल जाधव (करमाळा) तर सुभाष घोडके उपविजेता ठरला. महिला गटात हिंगोलीची कल्याणी गाडेकर हिने प्रथम क्रमांक पटकावत स्व. संभाजी पोटदुखे स्मरणार्थ चांदीची गदा मिळवली, तर आनंदी वांढरे हिने उपविजेतेपद मिळवले.


    या महादंगलच्या यशस्वी आयोजनासाठी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसे नेते राजू उंबरकर, मार्गदर्शक पांडुरंग लांजेवार, मोरेश्वर बोंडे, सुरेश रायपुरे, फारुख रंगरेज, प्रमोद निकुरे, विजय थेरे, दिपक पचारे, संजय शिवरात्रीवार, विलास आसुटकर, दिपक बोंडे, जान पोन्नलवार, संतोष जोशी, राजु देवडे, शेख अकील, अजय बोबडे  यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे शिप्रमं अध्यक्ष श्री विजय मुकेवार यांचे अती मोलोचे सहकार्य लाभले.

     विदर्भ केसरी स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर लवकरच "महाराष्ट्र केसरी" स्पर्धेचे आयोजन करणार असल्याची घोषणा श्री राजु उंबरकर यांनी केली.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप खाडे तर आभार प्रदर्शन सुर्यकांत मोरे यांनी केले.



    Photo