ठळक बातम्या

    काव्यदोष पूर्वार्ध चे प्रकाशन संपन्न. डॉ. स्वानंद गजानन पुंड यांचे ९२ वे प्रकाशन

     

    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कटिबद्ध असणाऱ्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभा ह्या नागपूरच्या सुप्रसिद्ध संस्थेच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ७५ ग्रंथांच्या प्रकाशनाच्या भव्य महत्वाकांक्षी योजनेमध्ये, कुलगुरू डॉ श्रीनिवास वरखेडी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय  नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आर्थिक सहकार्यातून वाग्देवी लीना रस्तोगी यांच्या प्रधान संपादकत्वाखाली प्रकाशित होत असलेल्या ग्रंथ मालिकेत विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांचा काव्यदोष पूर्वार्ध या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या निमित्ताने डॉ. स्वानंद पुंड यांच्या प्रकाशित ग्रंथांची संख्या ९२ झाली आहे हे विशेष उल्लेखनीय. 

             यवतमाळ येथील साप्ताहिक जयध्वज मध्ये प्रकाशित होत असलेल्या या लेख मालिकेमध्ये काव्यशास्त्राचे महान जाणकार आचार्य मम्मट ह्यांनी लिहिलेल्या काव्यप्रकाश ह्या ग्रंथाच्या सातव्या उल्लासामध्ये अत्यंत विस्तृत स्वरूपात वर्णन केलेल्या दोषांचे निरूपण करण्यात आलेले आहे

              यामध्ये १६ प्रकारच्या पदगत , १३ प्रकारच्या वाक्यगत, ७ प्रकारच्या पदैकदेशगत आणि २१ प्रकारच्या वाक्यांशगत  अशा तब्बल ५७ काव्य दोषांचे विविध उदाहरणांच्या द्वारे सविस्तर स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. दोषाचे स्वरूप स्पष्ट करीत विविध उदाहरणांमध्ये हा दोष कसा निर्माण झालेला आहे? आणि काही प्रसंगी तो कसा दूर करता आला असता? ह्या विषयीच्या विवेचनाने संपन्न काव्यप्रकाशचा हा भाग विविध विद्यापीठांच्या पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असल्याने हा ग्रंथ विद्यार्थ्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 

            या उल्लासात वर्णन केलेले अर्थगत दोष आणि रसगत दोषांचे विवेचन ह्याच ग्रंथ मालिकेच्या पुढील टप्प्यात काव्यदोष-उत्तरार्ध ह्या नावाने प्रकाशित होणार आहे. त्याचप्रमाणे काव्यगुण ह्या विषयावर देखील ग्रंथ प्रकाशित करण्याची लेखक आणि प्रकाशकांची मनीषा आहे. विविध ग्रंथांचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, वाग्देवी लीनाताई रस्तोगी, चंद्रगुप्तजी वर्णेकर, डॉ .वीणाताई गानु डॉ. नंदा पुरी डॉ. कविता होले तथा अन्य मान्यवर उपस्थित होते

               ज्या विद्यार्थ्यांना आणि संस्कृतप्रेमी व्यक्तींना हा ग्रंथ हवा असेल त्यांनी संस्कृत प्रचारिणी सभेच्या 94045 82107 या क्रमांकावर  दु. ४ ते संध्या ६ या वेळेत संपर्क करावा.



    Photo