विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त येथील जैताई देवस्थानात आयोजित “श्रीराम चरित्र दर्शन” प्रवचनमालेचा समारोप अत्यंत भक्तीमय वातावरणात झाला. प्रख्यात प्रवचनकार विवेक घळसासी यांनी चार दिवसांच्या प्रवचनमालेत भगवान श्रीराम यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडून श्रोत्यांना रामतत्त्वाचा सखोल वेध घ्यायला लावला.
प्रवचनमालेच्या चौथ्या दिवशी बोलताना घळसासी यांनी रामायणात सर्वत्र व्यापलेल्या रामतत्त्वाचे महत्त्व विशद केले. श्रीरामांच्या जीवनातून राष्ट्रधर्म, कर्तव्यनिष्ठा आणि आदर्श आचरण यांचे उत्तम उदाहरण समाजासमोर येते, असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यभावना जागृत करण्यासाठी रामतत्त्वाची आवश्यकता अधिक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
श्रीरामांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात देवत्वाचा आभास न दाखवता आदर्श मनुष्य म्हणून जीवन जगले. “पूजनीय झालो तर अनुकरणीय राहणार नाही,” ही त्यांची भूमिका होती, असे सांगत प्रत्येक माणसामध्ये देवत्व दडलेले असून योग्य आचरणातून ते प्रकट होऊ शकते, हा संदेश त्यांनी दिला.
राम-रावण युद्धाच्या संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, रावणाने यक्ष, गंधर्व व देवतांकडून मृत्यू नको असा वर मागितला होता; मात्र मानव आणि वानर यांचा विचार केला नव्हता. त्यामुळेच श्रीरामांनी मानव रूपात रावणाचा पराभव करून अधर्माचा नाश केला. विजय मिळवल्यानंतरही श्रीरामांनी देवत्व नाकारून स्वतःला सामान्य माणूस असल्याचे अधोरेखित केले, हे त्यांच्या महानतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच वाल्मिकी यांनी दिलेल्या संदेशाचा उल्लेख करत, शुद्ध, निष्कपट व सत्यप्रिय व्यक्तींच्या हृदयातच श्रीराम वास करतात, असे सांगत मनशुद्धी व आचरणशुद्धीचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
भक्ती, त्याग, संयम आणि मध्यम मार्ग यांचे महत्त्व स्पष्ट करताना अवडंबर कमी करून शांततेकडे वाटचाल केल्यास जीवनात परमात्म्याची अनुभूती मिळते, असे त्यांनी सांगितले. अज्ञान, आसक्ती आणि अहंकारातून मुक्त होणे म्हणजेच मोक्ष असून भक्ती हा सर्वश्रेष्ठ योग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रवचनमालेमुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये राष्ट्रप्रेम, नैतिकता आणि आध्यात्मिक जाणीव जागृत झाली असून कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

