विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : " मानवी जीवनामध्ये अनेक सद्गुण असतात. मात्र त्या सद्गुणांचा उपयोग करताना देखील एक विवेक आवश्यक असतो. तो नसला तर सद्गुण देखील सद्गुण विकृती या अत्यंत भीषण परिस्थितीत परिवर्तित होतात. भारतीय इतिहासामध्ये आपल्याला अशी सद्गुण विकृती वारंवार पहावयास मिळते. श्रीरामांच्या सद्गुणांचे चिंतन करताना त्या गुणांच्या सोबत आवश्यक असणारा हा विवेक देखील श्रीरामचरित्रातून शिकायला हवा. श्रीरामांची उपासना आणि भारतीय संस्कृतीची जोपासना करताना आपण केवळ प्रेक्षक राहून चालणार नाही तर संस्कृतीचे रक्षक म्हणून उभे राहायला हवे. " असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अमृतवक्ता विवेकजी घळसासी यांनी केले.
वणी नगरीची ग्रामदेवता असणाऱ्या जैताई मातेच्या चैत्र नवरात्र उत्सवामध्ये श्री राम चरित्र दर्शन प्रवचन मालिकेमध्ये तिसरे पुष्प गुंफताना ते श्रीरामांच्या विविध गुणांवर व्यक्त होत होते.
कार्यक्रमाच्या आरंभी देवस्थानचे सदस्य जयंत लिडबिडे यांनी सन्मान केल्यावर आपल्या शांत, प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण शैलीमध्ये घळसासी यांनी भगवान श्री रामचंद्रांच्या ठिकाणी असणारी अनुपमेयता, प्रशांतता, मार्दव, प्रियंवदता, कृतज्ञता, परगुण सहिष्णुता, स्वगुणमौनता, अविस्मरणीयता, अभिवादनशीलता, वृद्धोपसेवा, अरोगिता, दीनानुकंपा, धर्मज्ञता, वाचस्पतित्व, अर्थशास्त्र विशारदता, राजनीती कौशल्य, सैन्य शास्त्र पारंगतता अशा विविध गुणांच्या मांदियाळीला विविध घटनांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
श्रीरामांना प्राप्त करायचे तर निषाधाप्रमाणे मैत्री, लक्ष्मणाप्रमाणे अखंड जागृतता, केवटाप्रमाणे सेवा आणि शबरी प्रमाणे समर्पण या गुणांचा अंगीकार करायला हवा हे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर मुने यांनी केले.


