विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ५४ महिन्यांपासून सुरू असलेल्या “माझा गाव माझा वक्ता” या मासिक व्याख्यानमालेचे ५५ वे पुष्प “मानवाच्या समृद्धीसाठी योग” या विषयावर योगशिक्षक लक्ष्मणराव इद्दे यांनी गुंफले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वणी शाखेचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना लक्ष्मणराव इद्दे यांनी सांगितले की, स्पर्धेच्या युगात बदललेल्या जीवनशैलीमुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मन एकाग्र राहत नाही व मानसिक ताणतणाव वाढत आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योगाशिवाय पर्याय नाही. योगामुळे शरीर व मन निरोगी राहून आनंदी जीवन जगता येते.
ते पुढे म्हणाले की, योगामध्ये आसन, प्राणायाम, मुद्रा आणि चिंतन यांचा समावेश असून शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य टिकविण्यास तो अत्यंत उपयुक्त आहे. शरीरातील वात, पित्त व कफ यांचे संतुलन राखण्याचे कार्य योग करतो. योग म्हणजे शरीर व मन यांचा समतोल साधणे होय.
पतंजली ऋषी यांनी योगशास्त्राची मांडणी केली असून त्यांना योगाचे पितामह मानले जाते. स्वामी विवेकानंद यांनी योगाचे महत्त्व जगासमोर मांडले, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाचा प्रसार करण्याचे श्रेय रामदेव बाबा यांना जाते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून संयुक्त राष्ट्र संघ यांनी २०१५ मध्ये २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून घोषित केला. योगाच्या प्रसारासाठी केंद्र सरकारने आयुष मंत्रालय स्थापन केले असून या माध्यमातून योगाचा प्रचार-प्रसार केला जात आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रा. दिलीप अलोणे यांनी भारतातील योग चळवळीचा आढावा घेत योगाशिवाय परमार्थ साधना अशक्य असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व योगावरील गीत विजय गंधेवार यांनी सादर केले. सूत्रसंचालन विसा संघाचे सचिव तथा या व्याख्यानमालेचे संयोजक प्रा. अभिजित अणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश महाकुलकर यांनी मानले.


