विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : " भारतीय सनातन मूल्यांच्या विकृत सादरीकरणासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपातील षडयंत्र संपूर्ण शक्तीने कार्यरत असताना आपल्या या प्राचीन वारशाला, त्यातील संदेशांना, कथांना कालानुरूप स्वरूपात समजून घेण्याची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. रामायण ही केवळ पारायणाची गोष्ट नव्हे तर त्याद्वारे श्रीराम गुणांनी परायण होत आत्मविकास साधण्यासाठी महाकवी वाल्मीकींनी आणि इतरही रामायण कारांनी दिलेली ही सात स्तरीय सोपान पंक्ती आहे. ही आत्म विकासाची भारतीय शिक्षा पद्धती आहे. त्या दृष्टीने रामायणाचा अभ्यास करायला हवा." असे विचार सुप्रसिद्ध विचारवंत, रामकथा निरूपणकार अमृतवक्ता विवेकजी घळसासी यांनी व्यक्त केले.
वणीची नगरदेवता असणाऱ्या जैताई मातेच्या चैत्र नवरात्र उत्सवात श्री राम चरित्र दर्शन प्रवचन मालेच्या द्वितीय पुष्पात ते व्यक्त होत होते.
पहिल्या दिवशीच्या प्रवचनाचा थोडक्यात आढावा घेतल्यावर घळसासी यांनी बालकांडाचा प्रतिपाद्य विषय असणारी निरागसता, द्वेषहीनता, निर्दोषता, सरलता, अंगीकारल्यानंतरच अयोध्या कांडाची अपेक्षित युद्ध रहित अवस्था प्राप्त होते. तेथील निर्वैर, सातत्यपूर्ण प्रवाह शीलता आणि शीतलता हे शरयूचे गुण स्वीकारत आपला विकास होतो तेव्हाच आपण अरण्य कांड म्हणजे निर्व्यसन, संयमशीलता, त्यागवृत्ती स्वीकारू शकतो.
सु-ग्रीव म्हणजे सुंदर कंठ अर्थात अभिव्यक्ती असणारा जीव भित्रा असून चालत नाही. भयभीत माणसाला तारणारा देखील मारणारा वाटतो. मात्र तोच जीव भगवंताला शरणागत आला तर भगवान त्याला गळ्याशी लावतात हेच किष्किंधाकांड शिकवते.
अशा स्वरूपात शरणागत झालेला आणि भगवंताचा भक्त म्हणून, निष्कामता, निस्वार्थता या गुणांचा स्वीकार करणाराच सुंदर असू शकतो. ईश्वरी कार्यासाठी आणि परहितासाठी पराक्रमाचा उपयोग करतो तोच सुंदर हेच श्री हनुमंत सुंदर कांडा मध्ये सांगत असतात.
अशा जीवाला जानकीरूपी पराभक्तीची शोधयात्राच अ-शोक वाटिकेत घेऊन जाते. लंका हा शब्द उलट करीत तो भक्त काल दहन करू शकतो. हेच खऱ्या अर्थाने युद्धकांड असते. भक्तीमध्ये निष्क्रियता नव्हे तर विश्व विजयी वृत्ती वृद्धिंगत होणे अपेक्षित आहे.
अशा स्वरूपात सेवा करणाऱ्यालाच जीवनध्येय असे उत्तर स्वरूपात उत्तरकांड प्राप्त होते.
अशा या सात सोपान पंक्तींच्या आधारे संपूर्ण रामायण आपल्याला व्यक्तिमत्व विकासाचा एक महान आणि शाश्वत आलेख सादर करते.
अशा स्वरूपात त्यांनी श्रोत्यांना रामायणाकडे पाहण्याची आणि या आधारे आत्मविकासाची एक अभिनव दृष्टी प्रदान केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर मुने यांनी केले तर नामदेव पारखी यांनी वक्त्यांचा सन्मान केला. वणीकरांच्या वाढत्या प्रतिसादाने फुलत जाणारी ही प्रवचन मालिका आणखी दोन दिवस रोज सायंकाळी सात वाजता वणीकरांना आनंद देणार आहे.



