ठळक बातम्या

    पळसोनीत मध्यरात्रीचा मोठा स्फोट! प्रतिबंधित ‘हायब्रीड’ बियाण्यांचा काळाबाजार उघड; लाखोंचा साठा जप्त

     शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू होता; कृषी विभाग-पोलिसांची धडक कारवाई


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : वणी तालुक्यातील पळसोनी गावात मध्यरात्रीच्या सुमारास कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या टाकलेल्या धाडीत प्रतिबंधित आणि अनधिकृत कापूस बियाण्यांचा मोठा साठा उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाशी आणि त्यांच्या भवितव्याशी थेट खेळ करणारा हा प्रकार समोर आल्यानंतर कृषी विभागाने कठोर पावले उचलली आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या तक्रारीवरून अरुण शंकर भट (वय ४५, रा. पळसोनी ता. वणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ६ मे २०२६ रोजी रात्री ९ ते ९.२० वाजताच्या दरम्यान आरोपीच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत भारत सरकारने प्रतिबंधित केलेली तसेच अनधिकृतरीत्या विक्रीस ठेवलेली कापूस बियाण्यांची मोठी खेप पोलिसांच्या हाती लागली.

    धाडीत RR, Pinkgard-III, Pinkgard-5 आणि Hybrid Cotton Seeds या नावाने विक्रीसाठी ठेवलेली बियाण्यांची ८१ पाकिटे जप्त करण्यात आली. यात SURAKSHA, KAVERI, SILVER, GALAXY HYPER, JUMBO 5G PREMIUM, DHOOM-2, HARYALI 702, माऊली-5G अशा विविध नावांच्या बियाण्यांचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल १ लाख १५ हजार ७० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

    विशेष म्हणजे, या बियाण्यांपैकी अनेक नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून काही नमुने जागेवरच सीलबंद करण्यात आले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना निकृष्ट, बनावट किंवा प्रतिबंधित बियाण्यांच्या माध्यमातून फसवण्याचा मोठा रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    या प्रकरणी आरोपीविरुद्ध बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियम १९६८ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ/१२ अविनाश चिकराम, पोलीस स्टेशन वणी करीत आहेत.


    शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

    कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले की, बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्याकडूनच पक्के बिल घेऊन खरेदी करावी. आकर्षक नाव, कमी दर किंवा जादा उत्पादनाचे आमिष दाखवून विकली जाणारी बियाणे भविष्यात मोठे नुकसान करू शकतात. प्रतिबंधित किंवा बनावट बियाण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडू शकतात.




    Photo