विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे या अत्यंत सुदूर तथा आदिवासी बहुल क्षेत्रात शैक्षणिक परिवर्तनाचा मूळ आणि प्रमुख आधार.
महाविद्यालयात मान्यताप्राप्त सर्वच विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची आणि तब्बल बारा विषयात आचार्य पदवी संशोधन केंद्राची सुविधा उपलब्ध असणाऱ्या या महाविद्यालयात या शैक्षणिक सुविधांचा सोबतच नवोपक्रम स्वरूपात विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तथा लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या द्वारे आयोजित संगीत, कला , सांस्कृतिक कक्ष समन्वयकांच्या एक दिवसीय कार्यशाळेच्या निमित्ताने महाविद्यालयात या विविध उपक्रमांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
यामध्ये विद्यार्थी विकास विभाग संयोजक डॉ अभिजित अणे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वारली चित्रकारीच्या भेटवस्तू स्वरूपातील फ्रेम, वनस्पती शास्त्र विभागाच्याद्वारे डॉ. रवींद्र मते आणि डॉ.अजय राजूरकर यांच्या मार्गदर्शनात किरण चटारे यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ड्रायफ्लॉवर फ्रेम, रसायनशास्त्र विभागातील प्रा.राहुल ठेंगणे, प्रा प्रशांत लिहितकर, गणेश्वरी पिंपळ शेंडे यांच्या मार्गदर्शनात जयंत व्यवहारे, राजू आगलावे आणि कुशल झाडे यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या विविध सुगंधांनी युक्त हँडवॉश, एअर फ्रेशनर आणि सॅनिटायझर, भौतिकशास्त्र विभागाच्या डॉ. आदित्य शेंडे, प्रा. प्रवीण गोसावी आणि प्रा.अंजली आत्राम यांच्या मार्गदर्शनात मनोज सरमुकद्दम आणि आणि चामाटे यांच्या सहकार्याने तयार केलेल्या एलईडी बल्ब तथा प्राणीशास्त्र विभागाच्या डॉ ज्ञानेश्वर खामनकर, डॉ. परेश पटेल यांच्या मार्गदर्शनात मनीष पेटकर यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेले गांडूळ खत अशा विविध दैनंदिन उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनीला माननीय कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी केवळ भेटच दिली नाही तर तेथील उपक्रमांचे मुक्तकंठाने कौतुक करीत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या वस्तू स्वतःसाठी खरेदी देखील केल्या.
महाविद्यालय या दृष्टीने करीत असलेले प्रयत्न हे खरोखरच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, प्रशंसनीय आणि इतर सर्वांनी अनुकरण करावे असे आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि अर्थप्राप्तीला देखील सुयोग्य संधी प्राप्त होते असे विचार या प्रसंगी माननीय कुलगुरूंनी व्यक्त केले.
याप्रसंगी अन्य विविध विभागांच्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची देखील प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांनी माननीय कुलगुरूंना सविस्तर माहिती दिली.
जिल्हास्तरावरील या कार्यशाळेच्या निमित्ताने आयोजित या पाचही प्रदर्शनीच्या एक दिवसीय विक्रीतून तब्बल दहा हजार रुपयांची प्राप्ती या सर्व विभागांना झाली हे विशेष उल्लेखनीय. कार्यशाळेतील मार्गदर्शक डॉ राहुल एकबोटे आणि त्यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौ. नंदिनी एकबोटे यांनी देखील या सर्व उपक्रमांची मुक्तकंठाने प्रशंसा करीत विविध वस्तूंची खरेदी केली.
माननीय कुलगुरूंच्यासह संस्थेचे अध्यक्ष विजय मुकेवार, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक नरेंद्र ठाकरे यांनी देखील प्रत्येक विभागाचे कार्य समजून घेऊन विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
विद्यार्थी विकास विभागाच्या द्वारे आयोजित या कार्यशाळेला उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजक डॉ.अभिजित अणे यांनी विशेषत्वांने आभार प्रदर्शित केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विशेषत्वाने ग्रंथपाल डाॅ गुलशन कुथे तथा विजय उपाध्ये, मनोज केळकर, कार्तिक देशपांडे,राहूल करमरकर, बदूसिंग वडते,गणपत तुराणकर ,गणेश लोणारे,अरविंद ब्राम्हणे,आनंद नगराळे ,जयंत त्रिवेदी, पंकज सोनटक्के, नितेश चामाटे , संजय बिलोरिया ईश्वर लांजेवार , सचिन भुसे ,संजय चुर्हे , सुनील बोरकर इ. विविध कर्मचाऱ्यांचे मौलिक सहकार्य प्राप्त झाले.






