ठळक बातम्या

    भोंदू अशोक खरात व त्याचे राजकीय आश्रयदाते यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा करा : माकप

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : अशोक खरात या भोंदू बाबाने नाशिक येथे राज्यभरातील हजारो लोकांची आर्थिक व शारीरिक लूट केली आहे, मानसिक छळ केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती पाहता त्यात अनेक मोठे प्रभावशाली राजकीय नेते गुंतलेले दिसते आहे. अशा पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील सर्व दोषींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.

    कुणीही भोंदू बाबा एकट्याने इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक करू शकत नाही. त्यामागे राज्यातील सत्ताधारी, राजकीय नेते, आणि प्रशासनातील काही घटक यांचा हात असण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत सत्य समोर यावे यासाठी, या प्रकरणाची उच्चस्तरीय, स्वतंत्र व कालबद्ध चौकशी (SIT किंवा न्यायालयीन देखरेखीखाली) करण्यात यावी. अशोक खरात यांच्याशी संबंधित सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्यावी.

    या प्रकरणात कोणताही राजकीय नेता, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती सहभागी आढळल्यास त्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर  कठोर कारवाई करण्यात यावी.

    पीडित नागरिकांना तात्काळ न्याय आणि आर्थिक भरपाई देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी.

    राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कठोर अंमलबजावणी करून अशा प्रकारच्या घटनांना कायमचा आळा घालावा.

    कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, मग तो कितीही मोठा राजकारणी, अधिकारी किंवा सत्ताधारी घटक असो, या तत्वानुसार जे जे या भोंदूगिरीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साथ देत होते त्या सर्वांवर कारवाई करावी.

    या प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झालेले असल्याने सरकारने किंवा प्रशासनाने यात कोणत्याही प्रकारची ढिलाई होऊ देऊ नये. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. असे झाल्यास माकप या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही.

    आज देशात आणि राज्यात अंधश्रद्धा, अज्ञान आणि धार्मिक अंधभक्ती यांचा वापर करून जनतेची लूट करण्याचे प्रकार वाढत आहेत. हे केवळ सामाजिक प्रश्न नाहीत, तर सत्ताधारी व्यवस्थेच्या अपयशाचे आणि संगनमताचे द्योतक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्याय यांना तिलांजली देणाऱ्या या प्रवृत्तीविरोधात निर्णायक लढा उभारण्याची गरज आहे.

    माकप चे जिल्हा सचिव कॉ ॲड कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ ॲड दिलीप परचाके, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ चंद्रशेखर सिडाम, जिल्हा सचिव कॉ देविदास मोहकर, कॉ. डी बी नाईक, कॉ कवडू चांदेकर, कॉ उषा मुरखे, कॉ अनिता खुनकर, कॉ मनीष इसालकर, कॉ गजानन ताकसांडे, कॉ बादल कोडापे, कॉ किसन मोहुर्ले, कॉ रामभाऊ जिद्दीवार, कॉ पुंडलिक ढुमने, कॉ सदाशिव आत्राम, कॉ श्रीकांत तांबेकर, कॉ प्रीती करमणकर, कॉ सुरेखा बिरकुलवार, कॉ सुधाकर सोनटक्के आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व प्रगतिशील, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी शक्तींना, अशा भोंदूगिरी आणि त्यामागील राजकीय-सामाजिक युतीच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करत आहे.



    Photo