विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : प्रभू श्रीराम नवमी उत्सवानिमित्त वणी शहरात यंदाही भव्य व दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांची परंपरा जपत ही शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून, यंदाही शहर रामनामाने दुमदुमणार आहे.
दिनांक २६ मार्च, गुरुवार रोजी सायंकाळी ५ वाजता जुने स्टेट बँकजवळील पुरातन राम मंदिर येथे प्रभू श्रीरामाच्या रामरथाचे पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांच्या नेतृत्वात ही मिरवणूक निघणार आहे.
यावर्षीच्या शोभायात्रेत विविध आकर्षक देखावे सादर करण्यात येणार असून, अयोध्येतील रामललाची जिवंत प्रतिमा हे विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच हरियाणातील लाईव्ह हनुमान सादरीकरण देखील भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे.
शहरात भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज देवस्थानाचे भजन मंडळ तसेच विविध ठिकाणांहून आलेली भजन मंडळी सहभागी होणार आहेत. याशिवाय रामरथ, रामपालखी, घोडे, विविध बँड पथके आणि अनेक पालख्या शोभायात्रेत सहभागी होतील.
ही शोभायात्रा राम मंदिर (जुने स्टेट बँक), शाम टॉकीज चौक, काळाराम मंदिर मार्गे श्री रंगनाथ मंदिर चौक, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सरोदे चौक, टागोर चौक, तुटी कमान, गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक या मार्गाने पुन्हा राम मंदिर येथे येणार असून, महाआरतीने समारोप केला जाणार आहे.
या भव्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने रामभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री प्रभू राम नवमी शोभायात्रा उत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रणव पिंपळे तसेच समिती सदस्यांनी केले आहे.
