विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : " श्रीराम हे पूजनीय आहेतच पण त्याहीपेक्षा अधिक ते अनुकरणीय आहेत. श्री रामचंद्रांच्या अनुशासनाचा विचार करणे ही धार्मिकता आहे. त्यांचे अनुसरण करणे पारमार्थिकता तर त्यांच्या गुणांची अनुभूती येणे हेच अध्यात्म आहे. श्रीरामांच्या जीवनामध्ये आधारभूत तत्त्व असणारी वेदोक्त मर्यादेचे पालन करीत राष्ट्रधर्माच्या पालनाची वृत्ती ही खरी चिंतनाची आणि अनुकरणाची गोष्ट आहे." असे विवेचन अमृतवक्ता विवेक घळसासी यांनी केले.
वणी येथील ग्रामदेवता श्री जैताई मातेच्या मंदिरातील चैत्र नवरात्र उत्सवामध्ये आयोजित चार दिवसीय श्री राम चरित्र दर्शन प्रवचन मालिकेच्या पहिल्या दिवशी ते व्यक्त होत होते.
कार्यक्रमाच्या आरंभी प्रस्तावनेमध्ये जैताई देवस्थानचे सचिव ह.भ.प. भागवत कथाकार मनु महाराज तुगनायत यांनी विविध भक्तांना आलेल्या अनुभूतींच्या कथा सांगत जैताई देवीच्या जागृततेचे माहात्म्य वर्णन केले.
आपल्या अत्यंत शांत, प्रसन्न आणि मनोवेधक शैलीमध्ये विषयाची भूमिका निर्माण करताना विवेक घळसासी यांनी मर्यादा पुरुषोत्तम या शब्दापासून आरंभ करीत श्रीरामांच्या जीवनामध्ये राष्ट्रनिर्मितीसाठी त्यांनी वेदांच्या माध्यमातून सांगितलेली नीतिसंपन्न जननी आणि जन्मभूमी निष्ठा कशी आपल्या जीवनाची अधिष्ठान बनवली आहे हे उलगडून दाखविताना, भक्तीच्या नावाखाली आपण परमार्थ देखील रंजनाचा विषय केला. त्यामध्ये रंगून जाण्याच्या ऐवजी गुंतून जायला हवे. मानवी जीवनात भोगाचा अव्हेर नसला तरी योगावर लक्ष असायला हवे. श्री राम चरित्र भावनांचे केवळ नियंत्रण नाही तर उन्नयन शिकवते. श्रीरामांचे सकल आयुष्य हेच धर्माचे अविष्कृत स्वरूप आहे. आनंदामध्ये संयम आणि दुःखामध्ये विवेक म्हणजे राम. अशा अनेक पैलूंना श्रीराम कथेतील विविध प्रसंगांच्या आधारे अधोरेखित केले.
श्रीराम किंवा श्रीकृष्णांच्या बाल चरित्रातून आपण निरागसता समजून घ्यायला हवे. वनवास सुद्धा संत संगतीची सुसंधी आहे म्हणणारी श्री रामचंद्रांची सकारात्मकता स्वीकारत केवळ श्रीराम रुपाचे नव्हे तर श्रीराम तत्त्वाचे दर्शन व्हायला हवे. आपण आरशात पहात स्वतःला तिलक लावतो त्याप्रमाणे राम चरित्रात पाहत आपले चारित्र्य समृद्ध करायला हवे हीच श्रीराम चरित्र अभ्यासाची खरी पद्धती असल्याचे प्रतिपादन केले.
देवस्थानचे विश्वस्त बंडोपंत भागवत यांनी घळसासी यांचा सत्कार केला तर सागर मुने यांनी सूत्रसंचालन केले.



