ठळक बातम्या

    गांधी चौक गाळे प्रकरणावरून राजकारण तापलं; “विरोधक दिशाभूल करतायत” — सत्ताधाऱ्यांचा पत्रकार परिषदेत जोरदार पलटवार

     

    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : गांधी चौक येथील गाळे प्रकरणावरून वणीतील राजकारण चांगलेच तापले असून, विरोधकांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी गटाने केला आहे. सोमवारी (दि. २३ मार्च) नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम यांच्या कॅबिनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार खुलासा करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

    नगरपरिषद वणीच्या ४ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत गांधी चौक गाळे प्रकरणावर सखोल चर्चा झाली होती. मात्र विरोधी पक्षाचे गटनेते श्री. सुधीर थेरे यांनी माध्यमांमध्ये चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन खोटी बातमी पसरवल्याचे सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले.

    गांधी चौक परिसरातील तब्बल १६० गाळ्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. माजी नगरसेवक श्री. पांडुरंग कृष्णाजी टोगे यांच्या तक्रारी, तसेच उच्च न्यायालयातील प्रकरण व शासनाच्या स्थगिती आदेशामुळे कोणतीही ठोस कार्यवाही होऊ शकलेली नाही. परिणामी नगरपरिषदेला आर्थिक फटका बसत असल्याची कबुलीही यावेळी देण्यात आली.

    सभेत मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की, न्यायालयीन व शासन आदेशांच्या अधीन राहून कोणताही निर्णय घेऊ नये. ही बाब सर्व सदस्यांसमोर वाचून दाखविण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्या वेळी विरोधी सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती, मात्र हीच बाब त्यांनी नंतर माध्यमांपासून लपविल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.

    सभागृहाने कोणताही नवीन ठराव मंजूर न करता, राज्य शासन व उच्च न्यायालयाचे मत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पॅनल अधिवक्त्यामार्फत पुढील प्रक्रिया राबवली जाणार असून, सध्या तरी कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

    दरम्यान, गांधी चौक परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आधुनिक बहुमजली व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्तावही चर्चेत आला आहे. या प्रकल्पामुळे युवकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि नगरपरिषदेला भाडे, कर व पगडीच्या माध्यमातून उत्पन्न वाढेल, असा दावा करण्यात आला. मात्र या प्रस्तावावर अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

    विरोधकांकडून करण्यात येणारे आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप पूर्णपणे निराधार असून केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठाम आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. यासोबतच सभासदांची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला.

    “सभागृहात एक भूमिका आणि माध्यमांसमोर दुसरी भूमिका मांडणे ही दुहेरी भूमिका योग्य नाही. यामुळे जनतेत गैरसमज निर्माण होत आहेत,” असेही सत्ताधाऱ्यांनी ठणकावून सांगितले.

    वणी शहराच्या विकासासाठी गांधी चौकाचे आधुनिकीकरण आणि युवकांना रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करत, सर्व निर्णय कायदेशीर चौकटीत राहूनच घेतले जातील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

    या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, आरोग्य सभापती अनिल चिंडालीया, रवी बेलूरकर, यांच्यासह सत्ताधारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच माध्यमांनीही अपूर्ण माहितीच्या आधारे बातम्या प्रसिद्ध न करता वस्तुस्थिती पडताळूनच जनतेसमोर मांडावी, असे आवाहन करण्यात आले.



    Photo