ठळक बातम्या

    खोटे गुन्हे, बनावट तक्रारींचा खेळ? कामगार नेत्याचा संताप; निष्पक्ष चौकशीची मागणी- सुनील मोहीतकर

     

    सूडभावनेतून कारस्थान रचल्याचा आरोप; महिला कर्मचाऱ्यांना पुढे करून बदनामीचा डाव?



    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी येथील विश्रामगृहात २२ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कामगार नेते मा. श्री. सुनील मोहीतकर यांनी आपल्याविरोधात लावण्यात आलेल्या आरोपांचे जोरदार खंडन करत गंभीर आरोपांची मालिका उघड केली. वेकोलीतील तत्कालीन सब एरिया मॅनेजर मा. सुरेश घरडे यांनी सूडभावनेतून कटकारस्थान रचून आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला.

    मोहीतकर यांनी सांगितले की, आयटक युनियनचा अध्यक्ष म्हणून कामगारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने आवाज उठवल्यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक राग मनात धरला. कामगारांच्या प्रश्नांवर जाब विचारल्यावर सुरेश घरडे यांनी अभद्र वागणूक दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतरच सूड उगवण्यासाठी खोट्या तक्रारींचा खेळ सुरू झाला, असा आरोप त्यांनी केला.

    १५ ऑक्टोबर २०२५ रोजी महिला कर्मचारी प्राची दीपक रासेकर यांच्या मार्फत वणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली तक्रार ही पूर्णपणे बनावट असल्याचा दावा करत, या प्रकरणामुळे आपल्याला तब्बल १८ दिवस कारागृहात राहावे लागल्याचे त्यांनी सांगितले. “या खोट्या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागला. समाजातील बदनामी ही भरून न निघणारी जखम आहे,” असे ते म्हणाले.

    याच पार्श्वभूमीवर १७ मार्च २०२६ रोजी ॲड. सोनिया अमृत गजभिये यांनी चाकू हल्ल्याचा बनाव करून शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा गंभीर आरोप मोहीतकर यांनी केला. तक्रारीतील वेळेत आपण निवली (ता. वणी) येथे घराच्या बांधकामस्थळी उपस्थित असल्याचे पुरावे पोलिसांना सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही तक्रारही पूर्वीप्रमाणेच बनावट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

    ॲड. गजभिये या उच्च न्यायालयातील वकील असल्याचे सांगितले जात असले तरी त्या ज्या ठिकाणी राहतात ते निवासस्थान पूर्वी सुरेश घरडे यांना देण्यात आले होते, यावरून दोघांमधील संबंधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. “दोन्ही प्रकरणांमध्ये समान धागा दिसून येत असून हे सर्व नियोजनबद्ध कारस्थान असल्याचा संशय बळावत आहे,” असा दावा त्यांनी केला.

    चाकू हल्ल्याच्या कथित घटनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “गर्दीच्या ठिकाणी हल्ला झाला म्हणतात, मग मदतीला कोणीच का आले नाही? आरडाओरडा झाला का? या सर्व बाबी संशयास्पद आहेत,” असे त्यांनी सांगितले.

    या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करणार असल्याचे सांगितले. तसेच, “महिलांना पुढे करून कामगार नेत्यांचा छळ करण्याचा मोठा डाव तर नाही ना?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली.



    Photo