ठळक बातम्या

    मंदरमध्ये रात्र उजळवणारी कबड्डीची थरारक मैफल; शिवनेरी क्रीडा मंडळाचा भव्य जल्लोष

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी तालुक्यातील मंदर येथे शिवनेरी क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धांनी अक्षरशः गावकऱ्यांची रात्र उजळवून टाकली. मंदर गावातील जयवंत बोढे यांच्या शेतात रंगलेल्या या स्पर्धांना खेळाडूंसह प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण परिसरात उत्साह, जल्लोष आणि क्रीडामय वातावरण निर्माण केले.

    स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जय जगन्नाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयजी खाडे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि आयोजकांचे कौतुक करत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीने स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली.

    यावेळी बोलताना खाडे यांनी कबड्डी हा आपल्या मातीतला अभिमानास्पद पारंपरिक खेळ असल्याचे अधोरेखित केले. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये या खेळाबद्दल प्रचंड ओढ असून अशा रात्रकालीन स्पर्धांमुळे त्यांना आपल्या क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविण्याची मोठी संधी मिळते, असे त्यांनी सांगितले. तसेच अशा स्पर्धांमुळे तरुणांमध्ये शिस्त, संघभावना, जिद्द आणि आत्मविश्वास वाढीस लागतो, असेही त्यांनी नमूद केले.


    ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात अशा स्पर्धांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

    दरम्यान, या भव्य कबड्डी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन आणि यशस्वी आयोजन केल्याबद्दल मंदर येथील शिवनेरी क्रीडा मंडळावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आणि आयोजकांच्या मेहनतीमुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने क्रीडामहोत्सव ठरली.



    Photo