ठळक बातम्या

    मारेगावमध्ये अतिक्रमण धारकांचा इशारा; ८ दिवसांत जागा नियमन न झाल्यास आंदोलनाचा इशारा

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी /मारेगाव : मौजा मारेगाव गाव क्रमांक २८० मधील सिटी क्रमांक ६, गावठाण व अनधिकृत लेआउटमधील व्यावसायिक व निवासी अतिक्रमण धारकांनी त्यांच्या जागा नियमानुकूल करून देण्याची मागणी करत तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. महसूल व वन विभागाच्या दि. २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार संबंधित जागा कायमस्वरूपी नियमानुकूल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गेल्या सुमारे ५० वर्षांपासून या परिसरात अनेक नागरिकांनी निवासी व व्यावसायिक स्वरूपात अतिक्रमण करून वास्तव्यास व व्यवसाय सुरू ठेवले आहेत. यापूर्वीही अतिक्रमण धारकांनी २०११ पूर्वीचे पुरावे सादर करून तहसील कार्यालय, नगर पंचायत व जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे ऑनलाईन व ऑफलाईन प्रस्ताव दिले होते. तसेच मागील दोन वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.

    दि. २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करून सर्व अतिक्रमण धारकांच्या जागा नियमानुकूल करून देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा येत्या ८ दिवसांत प्रशासनाने हालचाल न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले.

    निवेदन देताना भाजपा तालुका महामंत्री प्रशांत नांदे, शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, महिला मोर्चा अध्यक्षा मंजुषा बोढाले, जेष्ठ नेत्या शोभाताई नक्षणे, शहर सरचिटणीस दुष्यंत नीकम, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत चोपणे तसेच मिलिंद राऊत, विराज पोटफोडे, प्रफुल उरकुडे, फैजान शेख, सलमान शेख, सुनिल परचाके, अविनाश राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



    Photo