विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वणी येथील धनोजे कुणबी महिला विकास संस्था आणि शारदा उत्सव समितीच्या सौ. संगिता संजय खाडे यांच्या वतीने समाजातील कष्टकरी, गरजू महिला तसेच रुग्णालयातील माता-भगिनींना फळे व थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. स्वतःच्या हिमतीवर प्रपंच चालवणाऱ्या महिलांच्या श्रमाचा सन्मान करत या दोन्ही संघटनांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. कार्यक्रमाची सुरुवात वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून उन्हातान्हात काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालय, नगराळे हॉस्पिटल परिसर तसेच शिवाजी चौकातील भाजी विक्री करणाऱ्या महिलांचा समावेश होता. याशिवाय, रस्त्याच्या कडेला बसून छोटे-मोठे लघु व्यवसाय करून आपला संसार चालवणाऱ्या श्रमजीवी महिलांना फळे आणि थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. रणरणत्या उन्हात काम करणाऱ्या या भगिनींना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला.
विशेषतः शारदा उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. संगीताताई खाडे यांच्या पुढाकाराने सरकारी रुग्णालयातील प्रसूती झालेल्या महिला रुग्णांना फळे आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. तसेच, पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचाही शाल आणि पाण्याची बॉटल देऊन गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता स्वाभिमानाने जगणाऱ्या या महिलांचा सन्मान करणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
याप्रसंगी धनोजे कुणबी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. साधनाताई गोहोकार, शारदा उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. संगीताताई खाडे, समिती सल्लागार किरणताई देरकर, वंदनाताई आवारी, अर्चनाताई बोधाडकर, कविताताई चटकी, साधनाताई मत्ते, स्मिताताई नांदेकर, प्रमिलाताई पावडे, हर्षाताई सपाट, वंदनाताई बल्की, कांचनताई देरकर, रिताताई पहापळे, अर्चनाताई पिदुरकर, वर्षाताई खाडे, शामाताई तोटावार, सीमाताई खाडे, सविताताई आवारी, सुरेखाताई ढेंगळे यांसह धनोजे कुणबी समाजातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वणी शहरात राबवलेल्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




