वणी: संस्कृत ही जनसामान्यांची भाषा आहे. ती प्रत्येक घरात आणि प्रत्येकाच्या मुखात असावी यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या संस्कृतभारतीच्या वणी शाखेच्या वतीने, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशपुर विभागातील श्री हनुमान मंदिरामध्ये संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
काल दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी गणेशपुरच्या सरपंच सौ. आशाताई जुनघरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या वर्गाची सांगता झाली.
याप्रसंगी प्रस्तुत करण्यात आलेल्या विविध संस्कृत सादरीकरणामध्ये राजवी खडतकर, श्रिया बुच्चे आणि रमा पाथ्रडकर यांनी गरुडगमन तव चरणकमलमिह,मनसि लसतु मम नित्यम् ,मम तापमपाकुरु देव ,मम पापमपाकुरु देव हे सुंदर गीत सादर केले.
रघुवीर शर्मा या छोट्याशा बालकाने श्लोक पठण केले तर माही शेडमाके हिने संस्कृत संख्या सादर केल्या. ह्रिदम ठाकरे याने संस्कृतमध्ये दिनचर्या सादर केली तर त्रिशा शेडमाके हिने संस्कृतमध्ये स्वतःचा परिचय करून दिला. नव्या चिरडे या लहानशा बालिकेने सादर केलेल्या भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायाने सर्व उपस्थितांची वाहवा मिळवली.
उपस्थितांपैकी सौ. रीता पाथरडकर आणि सौ.शारदा शर्मा यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
प्रमुख अतिथी आशाताई जुनघरी यांनी या सुंदर उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करून असे उपक्रम वारंवार आयोजित करावेत असे आवाहन केले.
संस्कृत भारतीचे नगर अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीचे संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत या वर्गाचे आयोजन करणाऱ्या, संस्कृत भारती प्रांत कार्यकारी सदस्य सौ. प्रणिता भाकरे यांच्या संस्कृत प्रचारातील मौलिक योगदानाबद्दल आनंद व्यक्त केला.
या संभाषण वर्गात एकूण ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. संस्कृत भारतीचे वणी शाखा उपाध्यक्ष प्रशांत भाकरे यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना संस्कार पुस्तिका तर संभाषण वर्गात सहभागी ज्येष्ठांना वदतु संस्कृतम् ! या पुस्तकाची भेट देण्यात आली.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सौ. मंगला पावडे, सीमाताई गुंडावार, सौ सुनंदा गुहे, सौ. अपर्णा परांडे, सुखदा बुजोणे यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी आपल्या पाल्यांच्या सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पालकांनी देखील उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.





