कलेतून समाजसेवेचा संदेश; वारली चित्रकलेच्या जतन व प्रसारावर सविस्तर चर्चा
विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : कलेच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यात कधी कधी अनपेक्षित आणि अविस्मरणीय क्षण येतात. असाच एक आनंददायी प्रसंग वणी येथील पोलीस उपनिरीक्षक व वारली चित्रकार शेखर वांढरे यांच्या वाट्याला रविवारी (दि. १२ एप्रिल) आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पांढरकवडा येथील संघ कार्यालयात मुक्कामादरम्यान शेखर वांढरे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही भेट घडून आली.
प्रारंभी पोलीस दलातील जबाबदारीमुळे थोडा संकोच वाटत असला, तरी प्रत्यक्ष भेटीनंतर वातावरण अत्यंत आपुलकीचे झाले. परिचयानंतर डॉ. भागवत यांनी विदर्भात वारली चित्रकलेवर काम करणाऱ्या कलाकाराबद्दल आश्चर्य व्यक्त करत आनंदही व्यक्त केला.
संवादादरम्यान त्यांनी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण, तिचा प्रसार आणि विदर्भात या कलेची रुजवण कशी करता येईल, याबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी शेखर वांढरे यांनी वारली चित्रकला हा आपला छंद असून, मोकळ्या वेळात मुलांना मोफत प्रशिक्षण देणे, तसेच विविध वर्गांचे आयोजन करणे असे उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. निवृत्तीनंतर या कलेच्या प्रसारासाठी अधिक वेळ देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. भागवत यांनी वांढरे यांच्या कलासाधनेचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले. “कलेतून आनंद आणि समाजसेवा साधता येते,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
या विशेष भेटीबद्दल भावना व्यक्त करत शेखर वांढरे म्हणाले की, “सरसंघचालकांची साधी, आपुलकीची वागणूक आणि कलावंतांबद्दलचा जिव्हाळा अनुभवायला मिळाला. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा आहे.”

