ठळक बातम्या

    हितोपदेश संधी प्रकरणाचे प्रकाशन संपन्न. चार ग्रंथांची मालिका संपूर्ण. डॉ. स्वानंद गजानन पुंड यांचा ९३ वा ग्रंथ.

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : भारतीय शिक्षण पद्धतीची प्राचीनतम रीती असणाऱ्या कथात्मक नीतीशिक्षणाचा अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय अविष्कार म्हणजे श्री नारायण पंडित विरचित हितोपदेश हा मौलिक ग्रंथ. 

          पाटलीपुत्र नगरीचे राजे असणाऱ्या सुदर्शन यांच्या तीन पुत्रांना महान नीतिशास्त्रवेत्ते पंचतंत्रकार पंडित विष्णुशर्मा यांनी प्राण्यांच्या, पशुपक्षांच्या कथांच्या माध्यमातून केलेला हा अलौकिक उपदेश. 

               मित्रलाभ, सुहृद्भेद, विग्रह आणि संधी अशा चार प्रकरणांनी संपन्न असणाऱ्या या ग्रंथाचे निरूपण करणारे तीन ग्रंथ यापूर्वीच प्रकाशित झाले असून आता या संधी प्रकरण नामक चौथ्या ग्रंथाच्या रूपात ही ग्रंथमालिका परिपूर्ण झालेली आहे. 

             सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी बंगाल प्रांतातील धवलचंद्र नावाच्या राजाच्या दरबारात असणाऱ्या नारायण पंडित यांनी लिहिलेल्या हितोपदेशातील कथांचे निरूपण करताना या ग्रंथ मालिकेत "कथा कशी आहे?" यापेक्षा "ती कथा तशी का आहे?" यावर भर देत विवेचन केले असल्याने कथावाङ्मयाच्या अध्ययनाचा हा सुंदर वस्तू पाठ ठरला आहे. 

               कोणत्याही कथेचा विचार करताना त्या कथेतून मी काय शिकावे ? ही विधी पद्धती आणि काय शिकू नये ? ही निषेध पद्धती, उलगडून दाखविण्यात आलेली असल्याने या सर्वच कथांचा , "आजच्या काळात, आपल्या जीवनात " असलेला उपयोग अधिक परिणामकारक स्वरूपात स्पष्ट झालेला आहे. 

              या महान ग्रंथातील प्रत्येक श्लोक आणि कथांच्या मागील कथनीय यांचे इतके व्यापक वर्णन पूर्वी मराठी भाषेत क्वचितच उपलब्ध असल्याने ही मालिका प्रत्येक संस्कृत आणि संस्कृती प्रेमींच्या दृष्टीने नितांत उपयुक्त आणि संग्राह्य ठरत आहे.

             नवीन पिढीवर संस्कार करण्यासाठीच निर्माण करण्यात आलेल्या या हितोपदेशाचे विस्तृत विवेचन करणारे, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभाग प्रमुख तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या लेखणीतून सिद्ध झालेल्या या ग्रंथ मालिकेने आपल्या घरातील ग्रंथसंपदा संपन्न करावी असे आवाहन प्रसाद प्रकाशनाच्या संचालिका सौ. उमाताई जोशी बोडस यांच्या वतीने करण्यात येत आहे.

    * हितोपदेश संधी प्रकरण.

    * विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड 

    * प्रसाद प्रकाशन पुणे 

         84460 37890

    * पृष्ठसंख्या -१३५

     •  मूल्य - १६५

        ( चारही ग्रंथ एकत्रित स्वरूपात देखील उपलब्ध आहेत.)



    Photo