ठळक बातम्या

    पदाधिकाऱ्यांविना ग्रामपंचायती ठप्प; वणी तालुक्यात प्रशासनाचा बोजवारा ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त; विकासकामांना ब्रेक, तातडीने निवडणुका किंवा प्रशासक नेमण्याची मागणी

     ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त; विकासकामांना ब्रेक, तातडीने निवडणुका किंवा प्रशासक नेमण्याची मागणी




    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    वणी/वणी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गावच्या प्रशासनाची चाके अक्षरशः ठप्प झाली आहेत. सत्तेचा अभाव आणि जबाबदारीची पोकळी यामुळे निर्णय प्रक्रिया पूर्णपणे कोलमडली असून विकासकामांना ब्रेक लागल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी नागरिकांना रोजच्या मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत आहे.

    ग्रामपंचायतींमध्ये निवडून आलेले पदाधिकारी नसल्याने कोणत्याही कामाला मंजुरी मिळत नाही, तर दुसरीकडे ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. गावात वेळेवर हजेरी नसणे, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.

    पाणीपुरवठा, स्वच्छता, कर वसुली, तसेच स्ट्रीट लाईटच्या वाढत्या बिलांमुळे ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. विशेष म्हणजे दिवसा देखील स्ट्रीट लाईट सुरू असल्याच्या घटना समोर येत असून, यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

    याशिवाय विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी रखडली असून, साध्या कामांसाठीही नागरिकांना पंचायत कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागत आहेत. प्रशासनाचा ताळमेळ पूर्णपणे बिघडल्याने गावाच्या दैनंदिन कारभारावर विपरीत परिणाम होत आहे.

    या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत, “तातडीने ग्रामपंचायत निवडणुका घ्या किंवा प्रशासक नेमा” अशी मागणी जोर धरत आहे. काही ठिकाणी माजी सरपंच व उपसरपंच यांची तात्पुरत्या प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचाही पर्याय पुढे आला आहे.

    दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीकडे तत्काळ लक्ष देऊन ग्रामसेवकांना नियमित उपस्थितीचे आदेश द्यावेत आणि प्रशासन सुरळीत करण्यासाठी तातडीची पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



    “गाव चालवायला माणूस नाही, आणि समस्या सोडवायला व्यवस्था नाही — वणी तालुक्यात ग्रामस्थांची कोंडी!”



    Photo