ठळक बातम्या

    रघुवंशम् सर्ग १० चे प्रकाशन संपन्न. डॉ. स्वानंद गजानन पुंड यांचा ९४ वा ग्रंथ.

     


    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    वणीमहाकवी कालिदास विरचित महाकाव्य रघुवंशम् च्या प्रत्येक श्लोकाचे अत्यंत सविस्तर विवेचन करणाऱ्या, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या लेखणीतून साकारलेल्या रघुवंशम् या ग्रंथ मालिकेतील दहावा ग्रंथ आज प्रकाशित होत आहे.

            १९ सर्ग आणि सुमारे १५०० श्लोकांचा अफाट विस्तार असणारे हे महाकाव्य. आज १० व्या सर्गाच्या रूपात ८२४ श्लोकाचे प्रकाशन म्हणजे सर्ग आणि श्लोक या दोन्ही दृष्टीने उत्तरार्धातील सीमोल्लंघन.

              भगवान राजा रामचंद्रांच्या दिव्य अवतरणाचा आनंदोत्सव साजरा करणारा हा सर्ग. 

             भगवान वैकुंठनाथ श्रीविष्णूंच्या चरण कमलापाशी एकत्रित झालेल्या सर्व देवतांनी रावणविनाशासाठी अवतार घेण्याची प्रार्थना करण्याच्या प्रसंगापासून या सर्गाचा आरंभ.

            आरंभी भगवान श्री विष्णूचे देवतांना झालेले दिव्य दर्शन. देवतांनी भगवान विष्णूंच्या अवर्णनीय स्वरूपाचे, अंग प्रत्यंगांचे, आयुधादिकांचे केलेले यथाशक्य वर्णन म्हणजे कोणत्याही महान आचार्यांनी केलेल्या स्तोत्राच्या समतुल्य वाटावे अशी ही अद्वितीय रचना. 

             आपल्या समस्येचे प्रतिपादन करीत देवतांनी केलेली प्रार्थना, प्रसन्न झालेल्या भगवान विष्णूंनी त्यांना दिलेले अभिवचन आणि त्यानुसार श्रीराम अवतार धारण करण्याची भगवंतांकडून मिळालेली ग्वाही. हे या सर्गातील पुढील विषय.

             वैकुंठातील या गोष्टींचे वर्णन केल्यावर महाकवींनी पृथ्वीवरील अयोध्येतील आनंदोत्सवाच्या केलेल्या वर्णनाला खरोखरच तोड नाही. 

              यज्ञ पुरुषाने प्रसाद स्वरूपात दिलेला पायस. त्याचे राजाने केलेले वाटप. कौशल्या आणि कैकयीने आपल्या भागातील सुमित्रेला दिलेला हिस्सा. परिणाम स्वरूपात त्यांना झालेली गर्भधारणा. त्यांचे दिव्य डोहाळे. भगवान रामचंद्र आणि भावंडांचे प्रगटीकरण अशा एकाहून एक सरस गोष्टींनी हा सर्ग परिपूर्ण आहे. 

             प्रत्येक घटना आणि त्यावर रचलेला महाकवींचा प्रत्येक श्लोक हा मुळातूनच आस्वाद घ्यावा असा विषय. 

            अत्यंत सातत्यपूर्ण रीतीने प्रकाशित होत असणाऱ्या या  ग्रंथमालिकेचा आपण स्वतः तर आस्वाद घ्यावाच पण आपल्या माध्यमातून प्रत्येक संस्कृत प्रेमी व्यक्तीपर्यंत हा आनंदोत्सव प्रसारित व्हावा असे आवाहन अविरत प्रकाशन जळगाव च्या वतीने करण्यात येत आहे.

    रघुवंशम् दशम सर्ग 

    विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद गजानन पुंड 

    अविरत प्रकाशन जळगाव 

    90288 68953

    पृष्ठ संख्या - ९४

    मूल्य - ₹ १७० (टपाल खर्चासह)



    Photo