विदर्भवार्ता । प्रतिनिधी
वणी - अमरावती विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भामध्ये विद्यापीठाचे राज्यपाल नामीत आदिसभा सदस्य गजानन कासावार यांनी दिनांक 29 सप्टेंबर 2025 च्या अधीसभेमध्ये प्रस्ताव ठेवला होता तो प्रस्ताव सर्वानुमते मान्य होऊन विद्यार्थी विकास विभागातर्फे आदेश निर्गमित होऊन या वर्षीपासून प्रत्येक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे. यासाठी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते व विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी विशेष लक्ष देऊन हा विषय मार्गी लावला.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातंर्गत पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठी वाड.मय हा एक महत्वाचा विषय आहे. विद्यापीठाशी सलंग्न असलेल्या विविध महाविद्यालयात अनेक उदयोन्मुख प्रतिभावंत विद्यार्थी मराठी साहित्याचा अभ्यास करीत आहेत. या विद्यार्थीमध्ये लेखन कौशल्य, सृजनशिलता व साहित्यिक जाण असलेले मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार मराठी या विषयाला प्रोत्साहन देणे व अशा विद्यार्थ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला व सृजनशिलतेला वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, हे विद्यापीठाचे नैतिक व शैक्षणिक कर्तव्य आहे. असा युक्तिवाद करून अमरावती विद्यापीठाचे अधिसभा सदस्य गजानन कासावार यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातंर्गत शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलन "आयोजित करण्यात यावे. या समेलनामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्य कृतीस सादरीकरणासाठी संधी उपलब्ध करुन द्यावे असा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव अधिसभेने सर्वानुमते मान्य केला. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विद्यार्थी विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार या विभागाने यावर कार्यवाही करून अमरावती विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये दरवर्षी विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात यावे असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार श्रीमती राधादेवी गोयनका महाविद्यालय अकोला व विदर्भ महाविद्यालय बुलढाणा येथे प्रत्यक्ष विद्यार्थी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्यकृती सादर करण्यासाठी तसेच नव्या साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असून भविष्यात राज्यभरातील शैक्षणिक संस्थांसाठीही हा एक आदर्श ठरू शकतो.


