ठळक बातम्या

    माँ जगदंबा पतसंस्थेच्या वणी शाखेचे उत्साहात उद्घाटन.... उद्घाटनावेळी भावनिक वातावरण :- सामाजिक कार्यालाही मान्यवरांची दाद...


    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

     वणी :- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतीसोबत जोडधंदा करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. केवळ निसर्गावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय स्वीकारल्यास आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी यावेळी दिला.

    संत गाडगे महाराज चौक, वणी येथे माँ जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था, पांढरकवडा-वणी शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेच्या आधीच तीन शाखा प्रगतीपथावर कार्यरत असून, वणीतील ही चौथी शाखा ठरली आहे. भविष्यातही शाखांचा विस्तार करून सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

     सोहळ्यात अथर्व लिंगमपल्लीवार याच्या भावपूर्ण गीताने उपस्थितांना भावूक केले. त्याच्या सादरीकरणातील प्रामाणिक भावना पाहून मकरंद अनासपुरे यांनी विशेष दखल घेतली. तसेच नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे व त्यांच्या पत्नी करत असलेल्या निराधार व मानसिक रुग्णांसाठीच्या कार्याचेही सर्वांनी कौतुक केले. या सामाजिक कार्याला आमदार व माजी आमदारांनी आर्थिक सहाय्य देत पाठबळ दर्शवले. नितीन पखाले यांनी नंददीप फाऊंडेशन च्या कार्याची माहिती देत बेघर निवारा केंद्र म्हणजे काय हे समजावून सांगितले. दरम्यान शिव आनंद लाठी काठी ग्रुप ची युवा प्रशिक्षक तेजस्विनी गव्हाणे हिचा सन्मान करण्यात आला. 

    या कार्यक्रमास आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, नगराध्यक्षा विद्याताई आत्राम, पणन महासंघाचे संचालक संजय खाडे, केशव नागरी पतसंस्थेचे सचिव अनिल अक्केवार, नितीन पखाले संचालक शब्दयात्रा प्रकाशन, ॲड. विनायकरावजी एकरे, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राकेश खुराणा, सहायक निबंधक सचिन कुळमेथे, लेखा परीक्षक आनंद लोढा, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष गजानन बेजंकीवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून संस्थेची प्रगती, आर्थिक स्थिती व प्रगतीपथावर असलेली सद्यःस्थिती सांगितली. तसेच त्यांनी सांगितले की, ही नवीन शाखा वणी शहराच्या आर्थिक प्रगतीस चालना देऊन सर्वसामान्यांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कार्यक्रमाचे संचालन मुख्य व्यवस्थापक सचिन अग्रवाल यांनी केले तर आभार सुरज चाटे यांनी मानले. 

    यावेळी काशिनाथ मिलमिले (उपाध्यक्ष), रमेश  भुरे (सचिव), विरभद्र पाटील, दिलीप  अंगलवार, राजेश पसलावार, सुनिल ठाकरे, भरत पोतराजे, विरेंद्र तोडकरी, विलास  बनकर, सौ. ज्योती अडपावार,  सौ. अर्चनाधुंदी, अजय  पालतेवार, मुख्य व्यवस्थापक सचिनजी अग्रवाल, मुख्य शाखेचे व्यवस्थापक सायली बडवे, घाटंजी शाखेचे व्यवस्थापक युधिष्ठिर राऊत, मुकुटबन शाखेचे व्यवस्थापक नितीन ठाकरे, वणी शाखेचे व्यवस्थापक सुरज चाटे चारही शाखेचे कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात  नागरिक, खातेदार, हितचिंतकांची उपस्थिती लाभली.




    Photo