विदर्भवार्ता|प्रतिनिधी
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर मिळताना दिसत आहे. केंद्र सरकारने वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून १ मे रोजी नागपुरात मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भवादी नेते मा. आमदार ॲड. वामनराव चटप करणार असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. विदर्भातील विकासाचा अनुशेष, शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रादेशिक असमतोल यांसारख्या मुद्द्यांवरून स्वतंत्र राज्याची मागणी पुन्हा ऐरणीवर आली आहे.
समितीकडून नागरिकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १ मे रोजी नागपुरात होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.


