ठळक बातम्या

    मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेला वेग; नाव कायम ठेवण्यासाठी ‘मॅपिंग’ अनिवार्य

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू-भगिनींना महत्त्वाची सूचना देण्यात आली असून, मा. भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत विशेष संक्षिप्त पूर्वालोकन (SIR) मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून हे काम वेगाने सुरू आहे.

    या मोहिमेत सन 2024-25 च्या मतदार यादीतील नावे आणि सन 2002 मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाच्या अंतिम यादीतील नोंदी यांचा मेळ घालण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या मतदारांचे नाव 2002 च्या यादीत होते, त्यांनी त्या वेळी असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदान केंद्र क्रमांक व यादीतील अनुक्रमांक संबंधित BLO यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

    तसेच ज्या मतदारांचे नाव 2002 नंतर मतदार यादीत समाविष्ट झाले आहे आणि ज्यांचे वय 40 वर्षांखाली आहे, अशा मतदारांनी त्यांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांची 2002 मधील मतदार यादीतील माहिती BLO यांना सादर करावी. विशेषतः विवाहानंतर नाव समाविष्ट झालेल्या महिलांनी त्यांच्या माहेरच्या कुटुंबीयांची 2002 मधील मतदार यादीची माहिती देणे बंधनकारक आहे.

    चालू मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी ‘मॅपिंग’ प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक असून, आवश्यक माहिती न दिल्यास संबंधित मतदारांचे नाव वगळले जाण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


    ही सूचना उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, वणी विधानसभा मतदारसंघ यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आली आहे.

    Photo