‘सट्टा + फायनान्स’चा घातक सापळा उघड; पडद्यामागील सूत्रधारांवर संशय, कारवाईची मागणी तीव्र
विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : आयपीएलच्या झगमगाटामागे वणी शहरात एक धक्कादायक आणि भयावह वास्तव समोर येत असून, सट्टेबाजीच्या जाळ्यात अडकलेली तरुणाई अक्षरशः आर्थिक व मानसिक अंधारात ढकलली जात असल्याचे गंभीर चित्र उघड होत आहे. हा केवळ सट्ट्याचा खेळ नसून, अत्यंत नियोजनबद्ध ‘फायनान्सियल ट्रॅप’ असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
माहितीनुसार, आयपीएल सामन्यांवर मोठ्या रकमेचे सट्टे लावणारे अनेक युवक मोठ्या प्रमाणावर पैसे गमावत आहेत. नुकसान झाल्यानंतर हतबल झालेल्या या युवकांना मदतीच्या नावाखाली काही टोळक्यांकडून कर्ज पुरवले जाते. मात्र हे कर्ज साधे नसून दरमहा तब्बल १० ते २० टक्के व्याजदराने दिले जात असल्याचे समोर येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, कर्ज देताना संबंधितांकडून कोरे चेक, घर-जमिनीची कागदपत्रे तारण म्हणून घेतली जात आहेत. परिणामी, अनेक युवक आर्थिक गुलामीत अडकत असून, त्यांच्या कुटुंबांवरही संकट कोसळत आहे.
या सट्टा-जाळ्यामुळे काही युवकांनी आपली दुकाने, घरे आणि शेती विकल्याच्या घटना समोर येत आहेत. तर काही युवक मानसिक तणाव सहन न झाल्याने आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचीही गंभीर चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे हा प्रश्न आता केवळ आर्थिक न राहता मोठ्या सामाजिक संकटाचे रूप धारण करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामागे वणीतील काही ‘बडे मासे’ आणि पडद्यामागील खरे सूत्रधार सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तरुणाईला या विनाशाच्या मार्गावरून परत आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

