विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : संस्कृत भाषा हा केवळ अभिमानाचा नव्हे तर नित्य आचरणाचा विषय असायला हवा या दृष्टीने प्रयत्नरत असणाऱ्या संस्कृत भारतीच्या वणी शाखेच्या वतीने, लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने छोरीया टाऊनशिप येथील श्री हनुमान मंदिरामध्ये संस्कृत संभाषण वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सोमवार दिनांक ६ एप्रिल रोजी परिसरातील ज्येष्ठ नागरिक तथा समाजसेविका सौ. सुनंदा गुहे आणि सौ. शारदा शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालेला हा वर्ग दिनांक १३ तारखेपर्यंत रोज सायंकाळी साडेसहा वाजता संचालित होईल.
संस्कृत भाषेच्या कोणतीही पूर्व ज्ञानाची आवश्यकता नसताना, पूर्णपणे निःशुल्क स्वरूपात, अगदी सहज हसत खेळत संस्कृत भाषा शिक्षणाची ही संधी नागरिकांना प्राप्त होत आहे.
संस्कृत भारतीच्या प्रांत कार्यकारणी सदस्या सौ. प्रणिता भाकरे यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत असणारे या वर्गाच्या संचालनासाठी संस्कृत भारती वणी शाखेचे उपाध्यक्ष सौ. मीरा काळे तथा कु.सुखदा किरण बुजोणे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
वणीतील संस्कृत प्रेमी जनतेने या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन संस्कृत भारतीच्या वणी शाखेचे अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक महाविद्यालय संस्कृत विभाग प्रमुख डॉ स्वानंद पुंड यांनी केले आहे.




