विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : दिंनाक-६/४/२०२६ ला तहसीलदार यांना निवेदन राज्यभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वणी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ या घोषणेद्वारे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या आंदोलनात मिलिंद पाटील, मंगल तेलंग, प्रक्षिक बरडे, आशिष पाझारे, मिलिंद नगराळे, चंदू भगत, प्रविण वनकर, संदीप खानखेडे, सचिन वानखेडे, अंकित पाझारे, प्रशिल तामगाडगे, शंकर शेंडे, डॉ. आनंद वेले, प्रतीक कांबळे, प्रतीक टिपले, विठ्ठल सातपुते यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्यातील गॅस टंचाईमुळे सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. घरातील स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस शेगड्या थंड पडल्या असून नागरिकांना कोळसा व लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्य स्टॉल्स, तसेच लहान-मोठे हॉटेल व्यवसाय बंद पडल्याने हजारो व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे.
शहरांमध्ये नाश्ता पदार्थ, इडली-डोसा व इतर खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. विवाहसोहळे, धार्मिक कार्यक्रम आणि केटरिंग व्यवसाय गॅस टंचाईमुळे पुढे ढकलण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना मेसमध्ये गॅस उपलब्ध नसल्यामुळे जेवणाची सुविधा बंद झाली असून अनेक विद्यार्थ्यांना गावाकडे परत जावे लागले आहे.
दरम्यान, अकोला येथे गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभ्या असताना माजी सरपंच शंकरराव शिरसाठ यांचा मृत्यू झाला, तर अमरावती येथेही एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्वीच दिलेला इशारा आता खरा ठरत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. केंद्र व राज्य सरकार परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असून ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी सिलेंडरमध्ये पाणी भरून देण्याचे प्रकारही घडत असल्याचा आरोप करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये गॅसची कृत्रिम टंचाई थांबवणे, काळाबाजार रोखणे, सिलेंडर वितरणातील अटी शिथिल करणे, दोषींवर कडक कारवाई करणे, विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करणे, परिस्थितीबाबत स्पष्ट माहिती देणे आणि उज्ज्वला योजनेचे ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

