विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी नगरपरिषदेकडून शहरात ‘अमृत पाणी’ योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असले, तरी या कामाकडे नगरपरिषद व संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
गुरुनगर परिसरात नुकतीच नवीन पाणी पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, टेस्टिंगसाठी खोदलेले खड्डे अद्याप तसेच उघडे ठेवण्यात आले आहेत. या निष्काळजीपणामुळे एका मुलाचा खड्ड्यात पडण्याचा प्रकार घडला असून, सध्या वाहनसुद्धा या खड्ड्यांत पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “अशा प्रकारच्या निष्काळजी कामामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ या कामाची दखल घेऊन उघडे खड्डे बुजवावेत, तसेच ठेकेदारावर योग्य कारवाई करून भविष्यातील अपघात टाळावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


