विदर्भवार्ता । प्रतिनिधी
वणी :दिनांक 20 एप्रिल व 23 एप्रिल 2026 रोजी वणी शहरातील भाजी मंडी परिसर तसेच ब्राह्मणी फाटा परिसरात लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर वणी पोलीस प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत चार आरोपींवर जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल सुधाकर नक्षीने (रा. रंगारीपुरा, वणी), शेख फारुख शेख सलीम (रा. पंचशील वार्ड, वणी), अंश सावंत पासवान (रा. पंचशील नगर, वणी) व रेहान मोहम्मद हनीफ शेख (रा. पंचशील नगर, वणी) यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. या छाप्यामध्ये एकूण ४,३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वणी पोलीस विभागाकडून सातत्याने माहिती संकलन करून विशेष पथकांच्या माध्यमातून अशा अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जात आहेत. शहरातील बेकायदेशीर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम पुढेही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले.
तसेच नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलीसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन वणी पोलीस निरीक्षकांनी केले आहे.

