विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी शहरानजीक असलेल्या चिखलगाव परिसरात झाडांची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी तब्बल ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीचे प्राचार्य डॉ. प्रसाद अरुण खानझोडे (वय ४७) यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षण प्रसारक मंडळ, वणी यांच्या मालकीची चिखलगाव (यवतमाळ रोड) लालपुलिया परिसरात ३२ एकर जागा आहे. या जागेवर सुमारे सहा वर्षांपूर्वी लावण्यात आलेली १४ बांबूची झुडपे (एकूण अंदाजे २१० बांबू) व १० सुबाभुळीची झाडे होती.
दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास फिर्यादी जागेचे मोजमाप करण्यासाठी तेथे गेले असता, संबंधित झाडे पूर्णपणे कापून अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याचे आढळून आले. चोरी गेलेल्या बांबूंची किंमत सुमारे ७३,५०० रुपये तर सुबाभुळीच्या झाडांची किंमत सुमारे २५,००० रुपये असून, एकूण नुकसान ९८,५०० रुपये इतके झाले आहे.
या प्रकरणाची नोंद दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली असून, पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल निलकमल भोसले करीत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः वनस्पतीशास्त्र विषयाशी संबंधित एका शिक्षकाकडून बांबू विक्री केल्याच्या चर्चांनी जोर धरला असून, यामागे नेमके कोण आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मात्र, या सर्व बाबी केवळ चर्चेच्या पातळीवर असून, अधिकृत तपासाअंतीच सत्य समोर येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


