विदर्भ वार्ता। प्रतिनिधी
वणी : वणी तालुक्यात सुधारित पीक विमा योजना 2025-26 अंतर्गत एग्रीकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया कंपनीकडे तालुक्यातील 13 हजार 132 शेतकऱ्यांनी तब्बल 1 कोटी 12 लाख 15 हजार 71 रुपये स्वहिस्सा भरून पिक विमा उतरविला होता. मात्र महापूर, जलमय परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे कापूस, तूर, सोयाबीन व ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही विमा भरपाई नाकारण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत शासनाने सानुग्रह अनुदान वाटप केले. त्यानंतर दिनांक 8 मे 2026 रोजी तालुका तक्रार निवारण समितीची बैठक तहसीलदार वणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी आणि सुमारे 200 शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचा पाढा वाचत संतप्त भावना व्यक्त केल्या. कृषी विभागाने पीक कापणी प्रयोग व उंबरठा उत्पन्नानुसार वणी तालुक्यातील शेतकरी विमा भरपाईस पात्र असल्याचे स्पष्ट केले. मात्र विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सॅटॅलाइट तंत्रज्ञानानुसार नुकसान दिसत नसल्याने शेतकरी भरपाईस अपात्र असल्याचे सांगितले. त्यामुळे “महापूर, अतिवृष्टी आणि जलमय परिस्थिती सॅटॅलाइटमध्ये दिसत नाही काय?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
शेतकरी, केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा मिळून कंपनीकडे सुमारे 79 कोटी 27 लाख 79 हजार 526 रुपये जमा होणार असून, कंपनी फायद्यात आणि विमाधारक शेतकरी मात्र तोट्यात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. विजय पिदुरकर यांनी विमा कंपनीवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत, “याबाबत आम्ही गप्प बसणार नाही. जिल्हाधिकारी यवतमाळ यांना जिल्हास्तरीय तक्रार निवारण बैठक घेण्यास भाग पाडू. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारला जाईल, प्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा दिला.
शेतकऱ्यांच्या मते, शंभर टक्के नुकसानानुसार सुमारे 56 कोटी रुपयांची भरपाई अपेक्षित होती. मात्र 70 टक्के जोखीम गृहीत धरूनही नुकसानग्रस्त तालुका जिल्हास्तरावर घोषित न झाल्याने विमा कंपनी अब्जावधी रुपयांचा फायदा कमावणार असल्याची चर्चा आहे.
“शेतपिकाचा विमा संरक्षणासाठी नसून शेतकरी व शेतपिकांचे भक्षण करण्यासाठीच आहे का?” असा संतप्त सवाल आता शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.

