विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातून बकऱ्या चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने पर्दाफाश करत तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीतील रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी परिसरात फरार आणि संशयित आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी वणी पोलीस ठाण्यात दाखल बकरी चोरी प्रकरणातील आरोपी जत्रा मैदान परिसरात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून सीताराम आसाराम भिसे (२४), सुनील रामप्रसाद साळुंखे (२७) आणि संजय राजू वायकर (२३, सर्व रा. गोकुल नगर, वणी) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपींनी बकरी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपासात सन २०२४ ते २०२६ या कालावधीत वणीसह इतर भागातही अनेक चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले. आरोपी चोरी केलेल्या बकऱ्या विविध आठवडी बाजारांमध्ये विक्री करत असल्याचेही उघड झाले आहे.
कारवाईदरम्यान आरोपी सुनील साळुंखे याच्याकडून चोरीतील शेळ्या विकून मिळालेली ७० हजार रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले टाटा कंपनीचे पिकअप वाहन (MH-29-BE-8012) जप्त करण्यात आले. वाहनासह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच आरोपींनी पारवा पोलीस ठाण्यातील अपराध क्रमांक ०३/२०२६ तसेच वडकी पोलीस ठाण्यातील अपराध क्रमांक ४८६/२०२४ आणि ६६२/२०२४ मधील गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. त्यामुळे या टोळीकडून आणखी अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील सचिन वायकर हा आरोपी फरार असून एलसीबीचे विशेष पथक त्याचा शोध घेत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


