ठळक बातम्या

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची वरपोड अतिदुर्गम आदिवासी पाड्याला भेट; विकासाच्या प्रश्नांवर दिला भर

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वरपोड | झरी जामणी : यवतमाळ जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी झरी जामणी तालुक्यातील वरपोड या आदिवासी पाड्याला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मूलभूत समस्यांची माहिती घेण्यात आली.

    अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविणे हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सचिव श्नी. संजय खाडे तसेच नवनियुक्त यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री. सचिन नाईक यांनीही गावकऱ्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.



    भेटीदरम्यान गावात जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे निदर्शनास आले. याबाबत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली.

    यावेळी दाभाडी गट ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सुभाष कुळमेथे आणि ग्रामस्थांनी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. तसेच क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची भेट देऊन उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

    या गावभेटीप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. आरिफ बेग, बाजार समिती सभापती श्री. राजीव कासावर, यवतमाळ जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्री. टिकाराम कोगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रकाश कासावर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ. वंदना आवारी, तालुकाध्यक्ष श्री. संदीप बुरेवार, नगरसेवक श्री. रियाज सय्यद, श्री. गंगाधर आत्राम, श्री. केशव नाखले, श्री. विठ्ठल केनेकार यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.






    Photo