विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी तालुक्यातील गणेशपूर येथील निर्मल नगरीस्थित सहजयोग मंदिर आश्रमात प. पू. श्री निर्मलमाता प्रणित एकदिवसीय सहजकृषी सेमिनार उत्साहात पार पडला. या सेमिनारमध्ये विविध मान्यवर वक्त्यांनी सहजकृषीचे महत्त्व, नैसर्गिक शेतीचे फायदे आणि शेतकऱ्यांनी आत्मिक शक्तीच्या माध्यमातून शेतीत प्रगती कशी साधावी याविषयी मार्गदर्शन केले.
सेमिनारमध्ये पुणे येथील पंजाबराव बिहाडे यांनी “दैनंदिन जीवनातील सहजकृषीचे महत्त्व” या विषयावर मार्गदर्शन करताना चैतन्य लहरींच्या माध्यमातून कृषी उत्पादनात वाढ होऊ शकते, असे सांगितले. चैतन्यमय व सामान्य बियाण्यांतील फरक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्रत्येक शेतकरी समूहाने कृषी उद्योगाची स्थापना करून विविध प्रयोगांचे रेकॉर्ड ठेवावे, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करावे आणि प्लास्टिकचा वापर टाळावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकचे सुधीर जोशी यांनी “तंत्रयुगातील सहजकृषी” या विषयावर बोलताना शेतकरी हा जगातील सर्वात मोठा सकारात्मक उद्योजक असल्याचे सांगितले. निराशा किंवा आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त शेतकऱ्यांना सकारात्मक बदल घडवून आणण्याची हमी त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी हळद व शेवग्याची शेती मोठ्या प्रमाणात करावी, असे आवाहन करत विषमुक्त धान्य उत्पादनाची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अमरावतीचे वैभव घुसे यांनी सहजकृषीचे प्रत्यक्ष अनुभव मांडताना शेतामध्ये श्री गणेशाची स्थापना करण्याचे महत्त्व सांगितले. सहजकृषीमुळे भरघोस उत्पादन मिळाल्याचा स्वतःचा अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. गजानन कडवे व संकेत यांनी युवाशक्तीने सहजकृषीकडे कसे वळावे याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संजय खोने, हिंमत मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहजयोगाचे जिल्हा समन्वयक विनोद मोहिनकर यांनी केले. सूत्रसंचालन विभागीय समन्वयक गजानन कासावार यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन हेपट यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी कुंटावार, योगेश इंगळे, एकनाथ सारवे, उत्तम पिंपळकर, सतीश वैद्य, दिनेश गेडाम , अक्षय कुंटावार, आकाश काकडे, चिन्मय काशिकर, मधुर इंगळे, अमित गोहणे यांनी परिश्रम घेतले.



